स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा

Swarajya-Sthapna

रायरेश्वराचे देवालय

पुण्याच्या नैर्ऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. तेथे १६४५ साली एक विलक्षण घटना घडली. शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होती. त्या किर्र अरण्यात झाडाझुडपांत लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत ते मावळे करत होते ? श्रीशंकरापाशी कोणते मागणे मागत होते ?

बालशिवबाची तेजस्वी वाणी

शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले, “गड्यांनो, मी आज तुम्हांला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हांला येथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे.

सर्व कसे छान चालले आहे, पण गड्यांनो, मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्याच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे का? आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. आपली माणसे या युद्धात नाहक मरतात. कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतात.

आपल्या मुलखाची धूळधाण होते आणि इतके सोसूनही आपल्या पदरी काय ? तर गुलामगिरी ! आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे ? सांगा, तुम्हीच सांगा ! वतनांच्या लोभाने आपण हे असेच चालू दयायचे का ?” शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले.

त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. नवीच दृष्टी त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, “बोला बालराजे, बोला. आपला मनोदय सांगा आम्हांला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत.” “हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू ! आमचे प्राणही देऊ !” ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले.

स्वराज्याची शपथ

मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले, “गड्यांनो ! आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजे “‘हिंदवी स्वराज्य’! तुमचे, माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्यांची गुलामी आता नको.

उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्यस्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार.” सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले. “हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे, असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया.” शिवराय शेवटी निश्चयाने बोलले.

रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले, ते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच. शिवरायांचे मन उचंबळून आले. ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले. घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माउलीला धन्यधन्य वाटले. आपण मनी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा, असा विश्वास त्यांना वाटू लागला.

मावळ खोऱ्यातील जमवाजमव 

शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी, डोंगरांतील आडमार्ग शोधावे, खिंडी, घाट, चोरवाटा निरखाव्या, असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. शिवरायांनी मावळ्यांची अंतःकरणे जिंकून घेतली. तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले.

शिवरायांसाठी जगायचे, शिवरायांसाठी मरायचे, असे ते मानू लागले. आता शिवरायांच्या हालचालींना उधाण आले, समुद्राला भरती यावी तसे. शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट, किल्ले आपल्या सवंगड्यांसह बारीक नजरेने न्याहाळले. चोरवाटा, भुयारे, तळघरे, दारूगोळा, हत्यारे आणि शत्रूच्या फौजांची ठाणी यांची खडान्खडा माहिती मिळवली.

मावळांतील सोबती

बारा मावळांत ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता. वतनासाठी ते आपापसात भांडत. या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात आहे, हे शिवरायांनी ओळखले.

त्याला आळा घालायचे त्यांनी ठरवले. शिवराय देशमुखांच्या गावांना भेटी देत. त्यांची समजूत घालत. स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना भारून टाकत. शिवरायांनी त्यांना गोड शब्दांनी आपलेसे केले, पण काहींनी दांडगाई केली. त्यांनाही शिवरायांनी वठणीवर आणले.

मराठ्यांचे आपापसातील झगडे त्यांनी थांबवले. जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला. मावळ खोऱ्यातील झुंजारराव मरळ, हैबतराव शिळमकर, बाजी पासलकर, विठोजी शितोळे, जेधे, पायगुडे, बांदल इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली. मावळांत स्वराज्याची घोडदौड सुरू झाली.

शिवरायांची राजमुद्रा 

Rajmudra

शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती. ती मुद्रा अशी

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।। शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।

प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंदय होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे; असे सांगणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा संकेतच होता.

त्या काळात राजमुद्रा बहुधा फार्सी भाषेत कोरलेल्या असत, पण शिवरायांची मुद्रा संस्कृत भाषेत होती. स्वराज्य हवे तशी स्वभाषा हवी, स्वधर्म हवा. त्याबरोबरच दुसऱ्या धर्माचा द्वेषही नको. शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठीच सुरू केला आहे, हे साऱ्या मावळ्यांच्या चटकन लक्षात आले. MPSC Online

 

Leave a Comment