स्वराज्याचे तोरण बांधले

रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली, पण केवढे अवघड कार्य होते ते ! दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा चार सत्ता त्या वेळी महाराष्ट्रावर हुकमत गाजवत होत्या.

या सत्तांचा दरारा मोठा होता. त्यांच्याविरुद्ध ब्र काढायची कुणाची हिंमत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्प बळ ! पण शिवरायांचा निश्चय अढळ होता. त्यातूनच बळ निर्माण झाले.

Torana-Killa

तोरणगड 

शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती. जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य ! ज्याचे किल्ले त्याचे राज्य ! किल्ला ताब्यात असला, की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे, असे शिवरायांनी मनाशी ठरवले.

तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यांपुढे होता. पुण्याच्या नैर्ऋत्येस चौसष्ट किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे. डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका. त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या. एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरीत्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजार आहे, लढाऊ आहे.

किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे. ती आहे झुंजार माचीवरून. ही वाट अतिशय अवघड आहे. वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार! महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यांत तोरणा किल्ला गणला जातो. किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे. त्यावरून त्या किल्ल्याला ‘तोरणा’ हे नाव पडले.

एवढा प्रचंड किल्ला ! पण आदिलशाहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते, की दारूगोळा नव्हता. शिवरायांनी हे हेरले. शिवरायांना नेमके हेच हवे होते. तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे, असे त्यांनी ठरवले.

स्वराज्याची नौबत झडली 

निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानद • खोऱ्यात उतरले. साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले. मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले.

येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी. त्याने चौकीवर पहारे बसवले. किल्ला ताब्यात आला. सर्वांनी शिवरायांचा जयजयकार केला. हिंदवी स्वराज्याची नौबत झडली. नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत घुमला. शिवरायांनी या किल्ल्याला ‘प्रचंडगड’ असे नाव दिले.

भवानीमातेचा आशीर्वाद 

तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला. त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली. किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राम्हण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. शिबंदीत मावळे, कोळी, रामोशी, महार इत्यादी जातीजमातींतील शूर माणसे नेमली. स्वराज्याच्या सैन्यात जातिभेद, वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता.

किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य ! मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या! कामकऱ्यांना आनंदीआनंद झाला. ‘शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच धन दिले’, असे जो तो म्हणू लागला. कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या.

एका मोहरेलाही कुणी हात लावला नाही. स्वराज्याचे धन होते ते ! ते त्यांनी आपल्या धन्याच्या स्वाधीन केले. स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला. आपल्या कार्याला आईभवानीचा आशीर्वाद आहे, असे त्यांना वाटले.

हे धन स्वराज्याच्या कामी आले. या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली. दारूगोळा जमा केला. उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्याचे ठरवले. तो बेत असा. तोरण्यापासून पंधरा किलोमीटरवर पूर्वेला मुरुंबदेवाचा डोंगर आहे.

शिवरायांनी तो हेरून ठेवला होता. हा डोंगर खूप उंच, अवघड आणि मोक्याचा होता. आदिलशाहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता. या किल्ल्यावरही पहारा ढिलाच होता, तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा, असे शिवरायांनी ठरवले.

स्वराज्याची पहिली राजधानी

एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला. तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुंबदेवाच्या डागडुजीसाठी खर्च झाले. शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले ‘राजगड’. गडावर पाथरवटांनी दगड घडवले. लोहाराने भाता फुंकला.

सुतार, गवंडी, मजूर, भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली. राजवाडा, बारा महाल, अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली.

स्वराज्याची घोडदौड

शिवरायांची घोडदौड सुरू झाली. बारा मावळांतील किल्ल्यांमागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. बारा मावळांत आनंद आणि उत्साह यांना पूर आला. गावोगावचे पाटील, देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले; परंतु तांदळात जसे काही खडे असतात, तसेच मावळांतही काही दुष्ट लोक होते शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी गेल्या. ठाणेदाराने विजापूरला सांडणीस्वार पाठवून शिवरायांच्या या घोडदौडीची हकीकत आदिलशाहाच्या कानी घातली.

शिवरायांचे चातुर्य

आदिलशाहा चकित झाला. त्याने शहाजीराजांना जाब विचारला. शहाजीराजांना मोठा पेच पडला, पण त्यांनी वेळ निभावून नेली. ‘जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही, म्हणून शिवाजीराजांनी किल्ला घेतला असावा,’ असे शहाजीराजांनी आदिलशाहास कळवले. शिवरायांनीही आदिलशाहाकडे जासूद पाठवला.

‘जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला. आदिलशाहाच्या हितासाठीच किल्ला घेतला. यात दुसरा काहीही हेतू नाही.’ असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी पाठवले. कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्लेही मोक्याचे होते. शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले. त्यानंतर रोहिडा ताब्यात घेतला. स्वराज्याची घोडदौड अशी जोरात सुरू झाली.



MPSC Online

 

Leave a Comment