Tapman – तापमान

 भौगोलिक स्पष्टीकरण

पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात. परंतु पृथ्वीचा गोल आकार व त्यामुळे होणारी वक्रता यांमुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात हे आपण पाहिले. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान होते. परिणामी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते.

                                   

तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुवृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत असे तीन कटिबंधांत (पट्ट्यांत) विभाजन करता येते. अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात. परंतु या घटकांचा परिणाम प्रादेशिक पातळीपुरता मर्यादित असतो.

ते घटक पुढीलप्रमाणे आहेत. समुद्रसान्निध्य, खंडांतर्गतता, समुद्रसपाटीपासूनची उंची प्राकृतिक रचना या घटकांनुसार प्रदेशांमधील हवामानात विविधता आढळते. यांशिवायढगांचे आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औदयोगिकीकरण इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक हवामानावर होत असतो.

आपल्याला नेहमी असे वाटते, की सूर्यकिरणांमुळे हवा तापते व गरम हवेमुळे जमीन व पाणी तापते. प्रत्यक्षात मात्र खालीलप्रमाणे घडत असते. जमीन व पाणी सूर्यकिरणांमुळे प्रथम तापतात. त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते.

त्यामुळे भूपृष्ठालगत असलेला हवेचा थर वरच्या दिशेने तापत जातो. म्हणूनच पृष्ठभागालगत हवा जास्त गरम असते व पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसतसे हवेच्या तापमानात घट होत जाते. समुद्रसपाटीला असणारे तापमान हे पर्वतीय भागात कमी झालेले आढळते.

जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर थंड झाली आहे. उन्हात ठेवलेले पाणी मात्र किंचित कोमटच राहते. जमीन व पाणी यांच्या तापण्याच्या व थंड होण्याच्या या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते, तर पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते.

परिणामी समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी असते तर रात्री जास्त असते. खंडांतर्गत भागात मात्र किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त असते व रात्री कमी असते. समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेत मिसळत असते.

                                     

पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवू शकते त्यामुळे या भागात हवा आर्द्र व उबदार राहते. याउलट परिस्थिती खंडांतर्गत भागात असते. बाष्प नसल्याने हवा कोरडी राहते. परिणामी तापमानातील फरक तीव्रतेने होतात. दिवसभराच्या कमाल व किमान तापमानांतील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात.

थोडक्यात, किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानांतील फरक कमी असतो, तर खंडांतर्गत भागात तापमानांतील हा फरक जास्त असतो. उदा. मुंबईचे तापमान सम आहे तर नागपूरचे तापमान विषम आहे. कोकण किनारी भागातील तापमान कक्षा कमी असते, तर विदर्भाकडे तापमान कक्षेत वाढ झालेली आढळते. किनारी प्रदेशात म्हणूनच सम हवामान असते. उदा. मुंबईचे हवामान सम, तर नागपूरसारख्या खंडांतर्गत प्रदेशाचे हवामान विषम असते.

हरितगृह वायूंचे परिणाम

वातावरणातील काही वायू जसे अरगॉन, कार्बन डायऑक्साइड इत्यादी व पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात. या वायूंमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. वातावरणातील या वायूंचे वाढते प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत ठरते आहे.

याच कारणाने पृथ्वीचे तापमान वाढत आहे, असे हवामान शास्त्रज्ञांचे मत आहे. हवामानातील हा बदल सार्वत्रिक आहे. यालाच जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. ज्या वायूंमुळे ही वाढ होते, त्या वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात.

पाणी तापल्यावर ते प्रसरण पावते. तळाकडील जास्त गरम पाणी वर येते. त्याबरोबर बटणे पाण्याच्या पृष्ठभागावर येतात, त्यामानाने वरचे थंड पाणी तळाकडे जाऊ लागते. त्याबरोबर बटणे देखील खाली जातात. असे सतत होऊ लागते, असे तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच तापल्यामुळे पाण्यात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो.

                                                               

निसर्गात मात्र थोडी वेगळी परिस्थिती असते. तापमानातील फरकामुळे महासागरांमध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी तसेच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात. क्षितिज समांतर प्रवाह हे तापमानांतील फरकाप्रमाणेच पाण्याच्या घनतेत झालेला बदल व वारे यांमुळे निर्माण होतात. हे सागरी प्रवाह विषुववृत्त ते ध्रुवीय प्रदेश व ध्रुवीय प्रदेश ते विषुववृत्त असे वाहतात. नकाशा ५.६ पहा.

             

सागरी प्रवाह ज्या वेळेस शीत कटिबंधाकडून उष्ण कटिबंधाकडे येतो त्या वेळेस उष्ण कटिबंधातील किनारपट्टीचे तापमान कमी होते. याउलट प्रवाह जेव्हा उष्ण कटिबंधाकडून शीत कटिबंधाकडे जातात तेव्हा तेथील किनारपट्टीचे तापमान वाढते.

 

उष्ण व शीत सागरी प्रवाह जर एखादया भागात एकत्र आले तर असा प्रदेश प्लवकवाढीसाठी सर्वोत्तम असतो. प्लवक हे माशांचे खादय आहे. अशा प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणावर येतात.

उबदार पाण्यात पुनरुत्पादन प्लवकाचा एक प्रकार करतात. माशांच्या मोठया संख्येमुळे या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो.

भूगोल दालन

नकाशांमध्ये वितरण दाखवण्याच्या अनेक पद्धती आहेत. यांपैकी ‘समरेषां’ चा आधार घेऊन वितरण दाखवता येते. या पद्धतीमुळे संबंधित घटकातील वितरण वैशिष्ट्ये चटकन नजरेसमोर आणता येतात. विविध नैसर्गिक घटकांच्या सांख्यिकी माहितीच्या आधारे, समान मूल्ये असलेली ठिकाणे नकाशात जोडून या रेषा तयार केल्या जातात.

उंची (समोच्च), तापमान (समताप), वायुदाब (समदाब), पर्जन्य (समपर्जन्य) इत्यादी घटकांचे प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावरील वितरण ‘समरेषांच्या आधारे दाखवले जाते.

 

पृथ्वीवरील तापमानाचा विचार करून नकाशे तयार केले जातात. आकृती ५.७ मध्ये दिलेल्या नकाशाचे वाचन करा. हा नकाशा ‘समताप’ रेषांच्या आधारे तयार केला आहे. या रेषा आकृती ५.७ जग भूपृष्ठीय उंचीचा परिणाम टाळून समान तापमान असलेली ठिकाणे जोडून तयार केल्या जातात. या रेषा सर्वसाधारणपणे अक्षवृत्तांना समांतर आहेत.

नकाशातील २५° से तापमानाच्या समताप रेषेचे निरीक्षण करा. ही रेषा विषुववृत्ता लगतचा प्रदेश व्यापते. या रेषेचा आकार एखाद्या लंबगोलासारखा वार्षिक तापमान दिसतो. मात्र या लंबगोलाचा उत्तर दक्षिण विस्तार खंडावर जास्त तर महासागरीय भागातून कमी आहे. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांच्या काही भागांवरून ही समताप रेषा जाते.

                             

पॅसिफिक महासागराच्या खूप थोड्या भागावर तापमान २५° से पेक्षा जास्त आहे. नकाशात ०° से मूल्य असलेल्या दोन समताप रेषा तुम्हांला दिसून येतील, त्यांचे निरीक्षण करा. यांतील दक्षिण गोलार्धातील ०° से ची समताप रेषा बरीचशी सरळ व अक्षवृत्ताला समांतर तुलनेने उत्तर गोलार्धातील याच मूल्याच्या रेषेत बरीचशी वक्रता दिसून येते.

नकाशाच्या पश्चिमेकडील आहे. पॅसिफिक महासागराच्या भागात ही रेषा बरीचशी सरळ आहे. मात्र उ. अमेरिका खंडावर प्रवेश केल्याबरोबर ती काहीशी उत्तरेकडे वळते. त्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाते. नंतर मात्र अॅटलांटिक महासागरात काही अंतरानंतर ती ईशान्येकडे वळते.

या ठिकाणी उष्ण सागरी प्रवाह (उष्ण तापमान) असल्याने सर्वच तापमान रेषा ईशान्येकडे वळलेल्या दिसतील. पुढे आशिया खंडात प्रवेश केल्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाताना काहीशी आग्नेयेकडे वळते. पुढे पॅसिफिक महासागरात समताप रेषा पूर्वेकडे बऱ्याचशा सरळ जाताना दिसतात.

दक्षिण गोलार्धातील समताप रेषा अक्षवृत्तांना समांतर आहेत. दक्षिण ध्रुवापासून मकरवृत्तापर्यंत या रेषांमधील अंतर जवळजवळ समान आहे. दक्षिण गोलार्धात जमिनीचे प्रमाण कमी असल्याने या भागाच्या तापमानात मुख्यतः अक्षांशांनुसार फरक पडल्याचे दिसून येते. उत्तर गोलार्धात मात्र या रेषांमधील अंतर कमी- जास्त झालेले आढळते.

या गोलार्धात जमिनीचे प्रमाण तुलनेत जास्त आहे. त्यामुळे अक्षांश व जमिनीचे प्रमाण या दोन्हीचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होताना दिसतो. जमिनीच्या भागात या परिणामामुळे समताप रेषांमधील अंतर कमी-जास्त होणे, समताप रेषा वक्र होणे या बाबी पहावयास मिळतात.

तापमापक

हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जातात. तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येते. पाऱ्याचा गोठणबिंदू – ३९° से आहे, तर अल्कोहोल गोठणबिंदू – १३०° से आहे. ही द्रव्ये तापमान बदलास संवेदनशील असतात. त्यामुळे तापमानातील – ३०° से पासून + ५५° से पर्यंतचा फरक या द्रव्यांच्या साहाय्याने सहज पाहता येतो.

                                                 

तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनहाइट या एककात मोजतात. ते तापमापकात दाखवल्यानुसार °C किंवा °F असे मांडतात. तापमापकाच्या साहाय्याने तापमानातील फरकाची (कमाल – किमान ) दैनंदिन नोंद ठेवता येते. हवेचे तापमान सेल्सिअस या एककात मोजतात.

Leave a Comment