उपयोजित इतिहास म्हणजे काय ?
‘उपयोजित इतिहास’ या संज्ञेसाठी ‘जनांसाठी इतिहास (पब्लिक हिस्टरी) असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे. भूतकाळातील घटनांसंबंधींचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो.
वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यांसारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो.
संग्रहालये, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते. समाजमनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्येही ते सहभागी होऊ शकतात.
उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन
इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या घटनांवरच आधारलेली असते. या घटना राजकारण, सामाजिक-धार्मिक संघटन तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो.
त्या त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर अवलंबून असते. त्या अनुषंगाने अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधनपद्धती उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ,
१. तत्त्वज्ञान : विविध विचारसरणींचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणींच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे. यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तत्त्वज्ञान समजून घेताना ते तत्त्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले त्या भाषेच्या इतिहासाचाही उपयोग होतो.
२. विज्ञान : वैज्ञानिक शोध आणि सिद्धान्त यांचा कालक्रम आणि त्या शोधांमागील कारणपरंपरेची साखळी समजावून घेणे. यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. गरज ही शोधाची जननी असते, असे म्हटले जाते. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात.
त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधांमागील कारणपरंपरा, कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते.
३. तंत्रज्ञान : कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारणपरंपरेची साखळी समजावून घेणे. यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असतात. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषीउत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे होते.
पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले, विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात, हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजावून घेणे आवश्यक असते.
४. उद्योगधंदे आणि व्यापार : उद्योगधंदे आणि व्यापार यांमुळे मानवी समाजांमधील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते. त्यामुळे सांस्कृतिक संबंधांचे जाळेही सतत विकसत असते. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचाच हा एक भाग असतो. त्यांचा इतिहास समजावून घेणे महत्त्वाचे असते.
बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप बदलत गेले, या सर्वांमागील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाजरचना बदलत गेली. हा सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादींचा इतिहास अभ्यासावा लागतो.
५. व्यवस्थापनशास्त्र : उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्यासंबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या, हे समजावून घेणे आवश्यक असते.
या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरांवरील लोकांची परंपरागत मानसिकता समजावून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनावर अवलंबून असतो, त्यांचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणे सोपे होते.
६. कला : विविध कलाक्षेत्रांमधील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक – भावनिक-सांस्कृतिक परंपरांच्या आधाराने झालेला कलांचा विकास समजावून घेणे महत्त्वाचे असते. कोणत्याही कलाविष्काराचे मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतो.
७. मानव्य ज्ञानशाखा : इतिहास, पुरातत्त्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांसारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजावून घेणे हे या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते.
वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्परसंबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजांमध्ये त्यासंबंधीची अनुमाने लोक बांधू लागले. त्यातून जगाच्या उत्पत्तीसंबंधीच्या कथा, सृष्टिचक्र आणि मानवी जीवनासंबंधीची मिथके, देव-देवतांसंबंधीच्या कल्पना आणि त्या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले विधी, त्यासंबंधीचे तात्त्विक विवेचन यांचा विकास झाला.
प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टींविषयींच्या विचारात तत्त्वज्ञानाची बीजे आहेत. इथे उल्लेख केलेल्या मानव्यशाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्त्वज्ञानातील सिद्धान्तांचा पाया आहे. इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते.
उपयोजित इतिहास आणि वर्तमानकाळ
इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. उपयोजित इतिहास म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरात वरील प्रश्नाचे उत्तरही आपोआप मिळते. भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमानकाळात अस्तित्वात असतात. त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते.
त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावासा वाटतो कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे, परंपरांचे अवशेष असतात. तो आपला सांस्कृतिक वारसा असतो. ती आपली ओळख असते. त्याच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते. त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते.
उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते. त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमानकाळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन, असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल.
सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन
(अ) सांस्कृतिक वारसा : हा मानवनिर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचा असतो.
१. मूर्त सांस्कृतिक वारसा : या प्रकारात प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे इत्यादींचा समावेश होतो.
२. अमूर्त सांस्कृतिक वारसा : या प्रकारात पुढील गोष्टींचा समावेश होतो.
* मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा.
* पारंपरिक ज्ञान.
* सणसमारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी.
* कला सादरीकरणाच्या पद्धती.
* विशिष्ट पारंपरिक कौशल्ये.
* अशा परंपरा, पद्धती, कौशल्ये इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूह, गट.
(ब) नैसर्गिक वारसा : निसर्गातील जैववैविध्याचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत केलेला आहे. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो :
(१) प्राणी (२) वनस्पतीसृष्टी (३) त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये.
पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. त्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केली जाते.
युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश २०१२ मध्ये केला गेला आहे. सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाटरांगांमध्येच आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे.
या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्त्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्त्व खाती करत असतात. इनटॅक ही (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज) स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात १९८४ पासून कार्यरत आहे.
सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्ये अनेक विषयांतील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळाच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते.
त्यामुळे :
(१) प्रकल्पांतर्गत वारसास्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे शक्य होते.
(२) स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, त्यांच्यापुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येतो.
(३) सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करता येते.
(४) स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते.
(५) स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील, अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी, यासाठी पदधतशीर नियोजन करणे शक्य होते.
संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्रांशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठी इतिहासाचे ज्ञान पूरक ठरते.
१. संग्रहालये आणि अभिलेखागार
२. ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन
३. पर्यटन आणि आतिथ्य
४. मनोरंजन आणि सपर्क माध्यमे
यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्ये प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. उदा., स्थापत्यविशारद, अभियंता, इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार व्यवस्थापक, कायदेतज्ज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ इत्यादी. ही यादी एवढ्यावरच संपत नाही. प्राचीन स्थळे, वास्तू आणि वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ज्ञांना पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते.
उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पांमुळे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. या पाठामध्ये आपण पाहिले, की उपयोजित इतिहास’ हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रबोधन कसे करता येईल, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती कशी निर्माण करता येईल.
त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्ये आणि क्षेत्रात वाढ कशी करता येईल, इत्यादी गोष्टींचा विचार आणि नियोजन करण्याचे काम उपयोजित इतिहासात केले जाते. ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये, त्यांचे पुढील पिढ्यांच्या हितासाठी योग्यरित्या जतन-संवर्धन व्हावे म्हणून हे आवश्यक आहे.