अन्न घेऊन सर्व सजीवांची शारीरिक वाढ होते तशीच आपलीही उंची व वजन जन्मल्यापासून प्रौढावस्थेपर्यंत वाढत राहते. काहींची आताची उंची व वजन तुमच्या उंची व वजनापेक्षा जास्त असेल तर काहींचे कमी असेल; परंतु त्यांच्या स्वतःच्या पहिली- दुसरीतील उंची व वजनापेक्षा ते जास्तच असेल, कारण साधारणपणे १८ वर्षांचे होईपर्यंत सर्व मुला-मुलींचे हे वाढीचेच वय असते.
कौशल्ये आणि कार्यक्षमता
बाळ लहान असते तेव्हा ते स्वतःची कुठलीच कामे करू शकत नाही. काही हवे असेल तर रडणे आणि हातपाय हालवणे एवढेच त्याला येते. पण काही दिवसांनी शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या हालचालींवर त्याचे थोडे नियंत्रण येऊ लागते आणि विविध हालचालींमध्ये थोडा समन्वय येऊ लागतो.
उदाहरणार्थ, पाहिजे त्या दिशेने मान वळवून बाळ वस्तूकडे बघू लागते. एखादी व्यक्ती ओळखीची वाटली, तर तिच्याकडे पाहून हसते. हातात वस्तू धरायला शिकते. हातात धरलेली वस्तू तोंडाकडे न्यायला शिकते. कोणीही न शिकवता हालचालींवरील नियंत्रण आणि समन्वय वाढला, की आणखीही काही कामे ते आपोआप करू लागते.
उदाहरणार्थ, वस्तू उचलून देणे, चमचा हातात धरून ताटावर आपटून आवाज काढणे. स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण येऊन एखादी नवीन कृती करायला येऊ लागणे, याला ‘कौशल्य शिकणे’ असे म्हणतात.
बाळ पहिल्या वेळी आईला किंवा वडिलांना पाहून ‘आई’ किंवा ‘बाबा’ म्हणते किंवा आधार न घेता पहिले पाऊल टाकते तेव्हा सर्वांना काय वाटते? तेव्हा ते काय करतात? विविध कौशल्ये शिकताना स्वतः बाळाला व इतरांनाही आनंद होतो. ते बाळाचे कौतुक करतात. बाळ त्याच त्या हालचाली पुन्हा पुन्हा करते.
असे केल्याने त्या कामांचा बाळाला भरपूर सराव होतो आणि त्याची ताकदही वाढते. हळूहळू बाळ नवीन शिकलेली कामे न चुकता व अधिक सहजतेने करू लागते, म्हणजे बाळाची कार्यक्षमता वाढते. दिवसेंदिवस आपण शिकत राहतो. त्यांच्या आधारे नवी कौशल्ये आत्मसात करणे सोपे होऊ लागते. उदाहरणार्थ, वस्तू धरायला येऊ लागले की बाळ चेंडू फेकायला शिकू शकते.
चालायला येऊ लागले, की धावणे, जिना चढणे, फेकलेला चेंडू पकडणे अशी अधिकाधिक कठीण कामे शिकता येतात. त्यांत आपल्या रोजच्या जीवनातील आवश्यक अशी कामेही असतात. उदाहरणार्थ, स्वतःच्या हाताने जेवणे, तोंड धुणे, अंघोळ करणे, कपडे घालणे इत्यादी.
विकास
आपली वाढ होते तेव्हा आपली उंची आणि वजन वाढते. वयाप्रमाणे आपली शारीरिक ताकदही वाढते. त्याचबरोबर आपण अनेक कौशल्ये शिकत राहतो. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते. यालाच ‘विकास होणे’ असे म्हणतात. चालण्या धावण्यासारखी सुरुवातीची काही कौशल्ये आपल्यात वयाप्रमाणे आपोआप येत असतात.
परंतु नंतरची अनेक कौशल्ये आपल्याला कोणीतरी शिकवावी लागतात. आपले आईवडील, शिक्षक, इतर मोठी माणसे या सर्वांकडून आपण अनेक कौशल्ये शिकत असतो. जितकी जास्त कौशल्ये आपण आत्मसात करतो, तितकेच आपले इतरांवर अवलंबून राहणे कमी होते.
तरीही आपले प्रत्येक काम आपण स्वतः करतो, असे कधीच होत नाही. उदाहरणार्थ, प्रत्येक व्यक्ती स्वतःचे कपडे शिवत नाही किंवा स्वतः शेती करत नाही, परंतु स्वतःची कामे पूर्ण होतील याची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकले पाहिजे.
आनुवंशिकता
आपली उंची किती वाढते ?
वयाच्या १८ वर्षांपर्यंत साधारणपणे आपली उंची वाढते, हे तुम्ही शिकला आहात. तुमच्या ओळखीतले १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे लोक आठवा. त्यांपैकी, आईवडिलांपेक्षा खूप उंच किंवा खूप कमी उंचीचे असलेले किती लोक आहेत ते पहा. आपले दिसणे, आपली अंगकाठी अशी अनेक शारीरिक लक्षणे साधारणपणे आपल्या आई- वडिलांसारखी असतात.
एका कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबतींत साम्य दिसून येते. आपली काही लक्षणे आपले आजी-आजोबा, मामा-मावशी किंवा काका-आत्यांसारखी असतात. म्हणून कित्येक वेळा त्यांना ओळखणारे, पण पूर्वी आपल्याला कधीही न भेटलेले लोक अशा साम्यांवरून आपल्याला ओळखतात.
आपल्या कुटुंबीयांसारखी आपल्यामध्ये जन्मतःच अनेक लक्षणे येणे, याला ‘आनुवंशिकता ‘ म्हणतात. आपली अनेक लक्षणे आपल्या नातेवाइकांसारखी असली, तरी जन्मतः आपल्यामध्ये कोणती लक्षणे आनुवंशिकतेने येतील आणि कोणती येणार नाहीत यांवर कोणाचेही नियंत्रण नसते.
चांगला आहार
वाढीसाठी अन्नाची गरज असते हे तुम्हांला माहीत आहे, परंतु काही परिस्थितीत वाढीच्या वयात कुपोषणामुळे विविध अन्नघटक पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. तेव्हा चांगला आहार मिळून जेवढी उंची झाली असती त्यापेक्षा ती कमी राहून जाते. वाढीचे वय गेल्यावर चांगला आहार मिळाला, तरी त्याचा वाढीसाठी उपयोग होत नाही.
विकासाला पूरक अशा इतर गोष्टी
उत्तम विकास होण्यासाठी पौष्टिक अन्नाबरोबर पुरेशा व्यायामाची गरज असते. चांगला अभ्यास करण्याची तसेच कुठलेही व्यसन लागू न देणे. याचीही दक्षता घ्यायला हवी असते. छंद जोपासावेत, खेळ व इतर कौशल्यांमध्ये सहभाग घ्यावा. अशी काळजी घेतल्याने प्रत्येकाचा चांगला विकास होतो. मुलगा असो वा मुलगी, प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विकास करण्याची व स्वतःचे जीवन समृद्ध करण्याची समान संधी मिळण्याचा पूर्ण हक्क आहे.
मी एक वेगळे व्यक्तिमत्त्व
तुमच्या वर्गात काही मुले-मुली अभ्यासात पुढे असतात तर काही खेळात पुढे असतात. काही छान गातात, तर काहींना नाटकात काम करणे छान जमते. प्रत्येक व्यक्ती इतर सर्वांपेक्षा वेगळी असते. आपली शारीरिक व मानसिक जडणघडण यांची इतरांशी तुलना होऊ शकत नाही.
आपल्याला काय करायला आवडते व आपण कशाचा सराव करतो यांतून आपले व्यक्तिमत्त्व विकसित होत असते. वाढीच्या वयात चांगले काय व वाईट काय याचा सारासार विचार करायलाही आपण शिकतो. आपले व्यक्तिमत्त्व तेव्हाच चांगले म्हणता येते, जेव्हा आपण चांगल्या विचारांप्रमाणे आचरण करतो.