Vahatuk – वाहतूक

आजच्या गतिमान युगात प्रवास व साहित्याची ने-आण करण्यासाठी आपल्याला विविध वाहतुकीच्या साधनांवर अवलंबून राहावे लागते.

वाहतुकीचे अनेक फायदे आहेत.

• कामे जलद गतीने होतात.

• वेळ व श्रमांची बचत होते.

• व्यापारवाढीस चालना मिळते.

• जगातील विविध प्रदेशाच्यामुळे एकमेकांशी जोडले गेले आहेत.

• जागतिक स्तरावरदेखील वस्तूंची वाहतूक सहज व सोपी झाली आहे.

• विविध वस्तू सहज उपलब्ध होऊन लोकांचे जीवनमान सुधारले आहे.

• पर्यटन, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान झाल्या आहेत.

• विविध प्रकारच्या वाहतुकींच्या सोईंमुळे जग जवळ आले आहे.

वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांची ये-जा सतत चालू असते. इंधनांच्या ज्वलनामुळे वाहनांतून सातत्याने धूर व काही विषारी वायू सोडले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड व सल्फर डायऑक्साइड हे वायू असतात. . तसेच धुरावाटे कार्बन, शिसे यांचे सूक्ष्मकण बाहेर पडतात व हवेत मिसळतात. या घटकांचा अतिरेक झाल्यास परिसरातील हवेची गुणवत्ता कमी होते. यालाच आपण हवेचे प्रदूषण म्हणतो.

हवेच्या प्रदूषणामुळे प्राणी व वनस्पतींवर पुढील परिणाम होतात.

श्वासनलिका, डोळे व फुप्फुसांचे विकार होतात. उदा. डोळे जळजळणे.

• झाडांची पाने करपतात व गळतात. कोंब (अंकुर) जळतात. झाडांची वाढ व विकास खुंटतो.

• वनप्रदेशांतून वाहनांची वर्दळ वाढल्यास तेथील प्राणी व वनस्पती यांच्या अधिवासास बाधा पोहचते. या प्रदेशातील वन्य जीव स्थलांतरित होऊ लागतात.

• वाहनांच्या सततच्या आवाजाने मोठ्या प्रमाणावर गोंगाट होतो. त्यामुळे अस्वस्थता, चिडचिड होणे, डोके दुखणे, लक्ष न लागणे, मनोविकार इत्यादी परिणाम होतात.

वाहतुकीची कोंडी झाल्यास त्या परिसरात हवेचे व आवाजाचे प्रदूषण वाढते. वाहनांच्या अपघातांमुळे जखमी होणे, मृत्यू होणे व वाहनांचे नुकसान होणे हे प्रकार घडतात.

जवळच्या अंतरासाठी पायी जाणे, तर थोड्या दूरवर जाण्यासाठी सायकल वापरणे अशा सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे स्वयंचलित वाहनांचा वापर टाळून प्रदूषण टाळता येते. सार्वजनिक व खासगी वाहनांचा वापर आवश्यकतेनुसार इतर वेळी केल्यास वेळ व श्रम यांची बचत होते. अशारितीने वाहतुकीच्या वाईट परिणामांची तीव्रता आपण कमी करू शकतो. याशिवाय प्रदूषण कमी करण्यासाठी पुढील उपाय आहेत.

(१) कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनांचा वापर करणे.

(२) वेळच्या वेळी वाहनांची देखभाल व दुरुस्ती करणे.

(३) शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करणे.

(४) आवश्यक तेथेच खासगी वाहनांचा वापर करणे,

 

 

(५) वृक्ष लागवड, विशेषतः वड, पिंपळ, कडूलिंब, करंज, इत्यादी भारतीय वृक्षांची लागवड व जोपासना करणे. स्थानिक पर्यावरणाशी हे वृक्ष सहज जुळवून घेतात व जैवविविधता वाढण्यास त्यांची मदत होते.

(६) प्रदूषणकारी इंधनांचा वापर टाळणे. वाहनांसाठी CNG किंवा LPG सारखी इंधने वापरणे.

                                                                                               

आजच्या आधुनिक युगात आपण इंधनावर चालणारी वाहने, जहाजे व विमाने वापरत आहोत. यापूर्वी वापरात असलेली जहाजे अशा प्रकारच्या यंत्रांवर चालत नसत. ही जहाजे वाऱ्याच्या वेगाचा वापर करून चालवली जात असत. त्यांना शिडाचे गलबत किंवा जहाज म्हणत. त्या काळात या | जहाजांचा वापर करून माणूस जगभर फिरला.

Leave a Comment