Vare – वारे

पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान नसतो, हे आपण शिकलो आहोत. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितिजसमांतर दिशेत होते. या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते. हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो. हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल, तेथे वारे मंद गतीने वाहतात.

सर्वसाधारणपणे जागतिक पातळीत हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक असेल, तेथे वारे वेगाने वाहतात. वाऱ्याचा वेगदेखील भिन्न भिन्न स्वरूपात आढळतो. वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्स या परिमाणात मोजला जातो. संपूर्ण पृथ्वीच्या संदर्भात विचार करता, पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो.

                                                             

उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. आकृती ५. २ पहा. आकृतीमध्ये ही दिशा वक्र बाणाने दाखवली आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्यांच्या मूळ दिशेत बदल होतो.

वारे ज्या दिशेकडून वाहत येतात, त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. उदा., पश्चिमी वारे म्हणजे पश्चिमेकडून येणारे वारे. वाऱ्यांची वाहण्याची दिशा, कालावधी, व्यापलेला प्रदेश, हवेची स्थिती यांवरून वाऱ्यांचे पुढील प्रकार पडतात.

ग्रहीय वारे 

पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहतात. हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात. त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे म्हणतात. उदा., पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारेदोन्ही गोलार्धांत २५° ते ३५° अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. (आकृती ५.३ पहा.)

पृथ्वीच्या परिवलनाचा या वाऱ्यांवर परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा बदलते. उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे, तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. हे दोन्ही वारे विषुववृत्ताजवळील हवेच्या शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात. या वाऱ्यांना पूर्वीय वारे असे म्हणतात.

                                                                 

दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून ६०° अक्षवृत्ताच्या जवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. (आकृती ५. ३) पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा बदलते. दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे, तर उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. या वाऱ्यांना पश्चिमी वारे असे म्हणतात.

दोन्ही गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय (५५° ते ६५°) कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात, त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात. या वाऱ्यांची दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असते.

माहीत आहे का तुम्हांला ?

दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात. दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंचसखलपणाचा अडथळा नाही. कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात. त्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते.

४०° दक्षिण अक्षांशापलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात या वाऱ्यांना ‘गरजणारे चाळीस’ (Roaring Forties) असे म्हणतात.

५०° दक्षिण अक्षांशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहत असतात. या भागात त्यांना ‘खवळलेले पन्नास’ (Furious Fifties) म्हणतात. ३ ६०° दक्षिण अक्षांशाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वाहतात. त्यांना ‘किंचाळणारे साठ’ (Screeching Sixties) म्हणतात.

स्थानिक वारे 

काही वारे कमी कालावधीत व विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात, हे स्थानिक वारे असतात. हे वारे ज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानावर त्यांचा परिणाम झालेला दिसून येतो. हे वारे निरनिराळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात.

दरीय वारे-वैशिष्ट्ये 

 दिवसा पर्वत शिखरावरील हवा लवकर तापून हलकी होऊन वर जाते. त्यामानाने दरितील हवा तापलेली नसते. या वेळी दरिशेत्रात शिखर भागापेक्षा वयुदाब जास्त असतो, म्हणून वारे दरीतून पर्वत शिखराकडे वाहू लागतात.

                                                                     

माहीत आहे का तुम्हांला ?

विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस सुमारे ५° अक्षवृत्तापर्यंत वर्षातील बराच काळ हवा शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत; म्हणून या पट्ट्याला विषुववृत्तीय शांत पट्टा (Doldrums) असे म्हणतात.

कर्कवृत्त व मकरवृत्ताजवळच्या २५° ते ३५° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो. हा पट्टा शांत पट्टा आहे, याला अश्व अक्षांश (Horse Latitude) असे म्हणतात.

 पर्वतीय वारे वैशिष्ट्ये 

* रात्री पर्वतशिखर लवकर थंड होते.
* दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो.
* पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो.
* पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात.
• दरीतील उष्ण व हलकी हवा वर ढकलली जाते, त्यामुळे थंड हवा दरीकडे वेगाने खाली येते.
* पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात.

जमीन जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेली असते. जमीन स्थिर व अपारदर्शक असते, त्यामुळे उष्णतेचे वहन जलद गतीने व जास्त प्रमाणात होते, म्हणून जमीन अधिक लवकर तापते. त्यामानाने पाण्याची घनता कमी असते. पाणी अस्थिर व पारदर्शक असते, त्यामुळे पाणी लवकर तापत नाही.

                                   

परिणामी, जमीन व सागरी भागातील हवेच्या दाबात फरक पडतो. दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते, तेथील हवाही जास्त तापते व हवेचा दाब कमी राहतो. समुद्राचे पाणी उशिरा तापते, त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व हवेचा दाब जास्त असतो.

                         

दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे सागरी (खारे) वारे होत. रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते. तेथे हवेचा दाब जास्त असतो. तेव्हा भूमीय ( मतलई) वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात. याशिवाय वेगवेगळ्या प्रदेशांत विशिष्ट परिस्थितीत वारे वाहतात. हे वारेसुद्धा स्थानिक वारे म्हणून ओळखले जातात. उदा., फॉन, चिनूक, बोरा, लू इत्यादी. पुढील पृष्ठावरील तक्ता पहा.

                                     

हंगामी वारे (मोसमी) 

जमीन व पाणी यांच्या ऋतूनुसार कमी-अधिक तापण्यामुळे मोसमी वारे निर्माण होतात. उन्हाळ्यात मोसमी वारे समुद्रावरून जमिनीकडे आणि हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. आग्नेय आशिया, पूर्व आफ्रिका, उत्तर ऑस्ट्रेलिया या प्रदेशांवर मोसमी वाऱ्यांचा विशेष परिणाम होताना आढळतो.

(आकृती ५.६ पहा.) भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा ऋतूंवर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव होतो. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा यांशिवाय पावसाळा व मान्सून परतीचा काळ असे ऋतू होतात.

मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे व मतलई वारेच असतात.

भारतीय उपखंडावर होणारी बहुतांश वृष्टी ही मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने होते. हे वारे विषुववृत्त ओलांडल्यावर नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात. यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात.

हे वारे बाष्पयुक्त असतात. सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत विषुववृत्तालगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे भारतीय उपखंडाकडून विषुववृत्ताकडे वारे वाहू लागतात. यांना ‘ईशान्य मोसमी वारे’ म्हणतात. हे वारे कोरडे असतात. वाऱ्यांच्या स्थिर व अतिवादळी स्थितीचा विचार करता. आपल्याला आवर्ताचा अभ्यास करणे आवश्यक असते.

आवर्त 

एखादया ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते. कमी हवेच्या दाबाकडे सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वेगाने वारे वाहतात. (आकृती ५.७ पहा.) पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात आवर्त वारे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत, तर दक्षिण गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात.

                                                                   

आवर्ताच्या वेळी आकाश ढगाळ असते. वारे वेगाने वाहतात आणि भरपूर पाऊस पडतो. आवर्त वाऱ्यांचे प्रभावक्षेत्र मर्यादित असते. या वाऱ्यांचा कालावधी, वेग, दिशा आणि क्षेत्र अतिशय अनिश्चित असते. उपग्रहाने घेतलेले चक्रीवादळाचे छायाचित्र आकृती ५.८ मध्ये पहा.

हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात आवर्ताचा केंद्रभाग हा ‘L’ (Low) या अक्षराने दाखवतात. आवर्त प्रणाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकते. आवतांना ‘चक्रीवादळ’ असेही म्हणतात.

चक्रीवादळे 

पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात, जपान, चीन, फिलिपाइन्स इत्यादी देशांच्या किनाऱ्यालगत निर्माण होणारी वादळे ‘टायफून’ नावाने ओळखली जातात. ही वादळे जून ते ऑक्टोबर या महिन्यांत निर्माण होतात. वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे ती विनाशकारी असतात.

                                                           
कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे म्हणजे ‘हरिकेन्स’ होय. ही वादळेसुद्धा विनाशकारी असतात. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग दर ताशी कमीत कमी ६० किमी असतो. याशिवाय समशीतोष्ण कटिबंधातही आवर्त तयार होतात. त्यांची तीव्रता कमी असते. ती विनाशकारी नसतात.

प्रत्यावर्त 

आकृती ५.८ चक्रीवादळ एखादया क्षेत्रात विशिष्ट वातावरणीय परिस्थितीत केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो. केंद्रभागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार दिशेत वाहत असतात. उत्तर गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात, तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात.

                                                                   

प्रत्यावर्ताच्या कालावधीत निरभ्र आकाश, कमी वेगाने वाहणारे वारे आणि अतिशय उत्साहवर्धक हवामान असते. प्रत्यावर्ताची स्थिती बहुधा काही दिवस अथवा एक आठवड्याची असू शकते. असे प्रत्यावर्त समशीतोष्ण कटिबंधात निर्माण होतात. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावर्ताचा केंद्रभाग ‘H’ (High) या अक्षराने दाखवतात.

प्रत्यावर्त हे जास्त दाबाच्या पट्ट्यात प्रकर्षाने जाणवतात. या प्रदेशांतून वारे बाहेर जात असतात, त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी असते. (आकृती ५.९ पहा.)

माहीत आहे का तुम्हांला ?

वादळांना नाव देण्याची प्रथा जगभर येणाऱ्या  विविध चक्रीवादळांना नावे देण्यात येतात. या नावांची यादी प्रत्येक महासागरासाठी तयार करण्यात येते. महासागराच्या अवतीभोवती असणाऱ्या देशांनी सुचवलेल्या नावांनुसार ही यादी तयार करतात.

वाऱ्याचा वेग ३३ नॉट्स (सुमारे ६० किमी प्रतितास) किंवा त्याहून अधिक असल्यास त्या वादळाला  नाव देण्यात येते. सामान्यपणे लक्षात राहावे, म्हणून  वादळांना नाव देण्याची पद्धत आहे.

Leave a Comment