मानवाच्या उत्क्रांतीदरम्यान त्याच्या शरीरामध्ये अनेक बदल होत गेले. शरीरावरील केसांचे प्रमाण कमी होते गेले, हा त्यांपैकीच एक बदल होय. शरीरावरील केसांचे आवरण कमी झाल्याने मानवाला ऋतुबदलांपासून संरक्षणाची आवश्यकता भासू लागली आणि त्यातून वस्त्र ही गरज निर्माण झाली.
मानवाने विविध काळांत वापरलेल्या वस्त्रांमध्ये विविधता दिसून येते. आदिम काळात सुरुवातीला मानव वस्त्र वापरत नसे. त्यानंतर झाडांची सालं व पाने वापरली जाऊ लागली. पुढे तो शिकार करून मारलेल्या जनावरांचे कातडे वापरू लागला. कापसासारख्या वनस्पतींपासून सूत तयार करण्याची कला अवगत झाल्यावर सुती कापडाचा वापर होऊ लागला.
निसर्गाने प्रत्येकाची गरज भागेल एवढे दिले आहे, परंतु निसर्ग माणसाचा हव्यास मात्र पूर्ण करू शकत नाही. मनुष्याने आपल्या गरजांना प्राधान्य दिले पाहिजे. तरच निसर्ग आपल्या सर्वांचा सांभाळ करू शकेल.
मुंबई हे कापड गिरण्यांसाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण होते. या बेटावर दमट हवामानामुळे लांब धाग्याचे कापड तयार करणे सुलभ होते. त्यामुळे मुंबई हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र बनले. कापड उद्योगाच्या भरभराटीमुळे भारताच्या विविध प्रदेशांतून रोजगारासाठी येऊन या ठिकाणी लोक स्थायिक झाले. तेव्हापासून मुंबई हे भारतातील आर्थिक घडामोडींचे महत्त्वाचे केंद्र बनले.