Vasudev Balwant Phadke – वासुदेव बळवंत फडके

Vasudev-Balwant-Phadke
                                 Vasudev Balwant Phadke

 

वासुदेव बळवंत फडके यांचे जीवन म्हणजे एक वीरगाथाच होय. ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी केलेले बंड हे अपूर्व असेच होते. त्यांचे बंड अयशस्वी झाले असले तरी त्यांच्या क्रांतिकार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक त्यांना मानले जाते.

Vasudev Balwant Phadke – वासुदेव बळवंत फडके

जन्म ४ नोव्हेंबर १८४५ रोजी वासुदेव बळवंत फडक्यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यात शिराढोण येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वतीबाई आणि वडिलांचे नाव बळवंत असे होते. त्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते लहानपणापासून वासुदेव हे अत्यंत चाणाक्ष बुद्धीचे हुशार होते लहानपणी कुस्ती घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले त्यांचे प्राथमिक शिक्षण शिराढोण येथे झाले आणि माध्यमिक शिक्षण मुंबई-पुणे कल्याण या ठिकाणी झाले.

शरीरप्रकृतीतील धडाकटपणा, अवयवांचा रेखीवपणा, सरळ नाक, गोरा रंग, घारे डोळे ही त्यांची बाह्य वैशिष्ट्ये होती. इ.स. १८५७ च्या उठावाच्या वेळी ते १२ वर्षांचे होते. इ.स. १८५७ च्या उठावात गाजणाऱ्या नानासाहेब पेशवा, तात्या टोपे, झाशीची राणी यांच्या हकीगती ऐकूण त्यांच्या मनात स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली होती.

पनवेल येथील दाजीसाहेब सोमण यांची कन्या सईबाईशी त्यांचा विवाह वयाच्या १५ व्या वर्षी झाला होता. शिक्षण घेतल्यानंतर ते नोकरीसाठी पुणे सदाशिव पेठ येथे आले सुरुवातीला त्यांनी रेल्वे खात्यात लिपिक म्हणून काम केले, त्यानंतर त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये काम केले.

रेल्वेच्या ऑडिट कचेरीत दरमहा २० रु पगाराची नोकरी त्यांना लागली होती. पण त्या कचेरीतील हेड क्लार्क त्यांच्याशी व इतर कारकुनांशीही अत्यंत तुसडेपणाने वागे. पण कार्यालयातील कामकाज व सुंदर हस्ताक्षरामुळे त्यांनी वरिष्ठांची मर्जी संपादन केली होती व त्यांचा पगार ६० रु. महिन्यापर्यंत वाढला होता.

Vasudev Balwant Phadke – वासुदेव बळवंत फडके

Click on below links to read more

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

Veer Savarkar – वीर सावरकर

ऑफिसच्या कामांत ते अत्यंत दक्ष होते. आपली आई आजारी आहे. तिच्या भेटीसाठी जावयाचे आहे म्हणून त्यांनी वरिष्ठांकडे रजेचा अर्ज दिला होता पण तो मंजूर न झाल्याने त्यांच्या आईचे दर्शन त्यांना झाले नाही. त्यामुळे ते संतप्त झाले. ब्रिटिशांबद्दल प्रचंड चीड त्यांच्या मनात निर्माण झालेली.

भावनाशून्य अधिकारी व त्यांची शिस्त याचा त्यांना राग आला. त्यांनी नोकरीचे त्यागपत्र दिले. पगाराचे त्यांना मुळीच आकर्षण नव्हते.

लोकजागृतीचे प्रारंभीचे कार्य – पुण्यात असताना त्यांनी स्वदेशी वापरण्याची शपथ घेतली आणि स्वदेशी चा प्रचार सुरू केला. समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी त्यांनी ऐक्यवर्धिनी संस्था सुरू केली. पुढे १८६० मध्ये त्यांनी पूना नेटिव्ह इन्स्टिटयूट स्थापन केली जी नंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या नावाने प्रसिद्ध झाली.

वासुदेव बळवंत फडके हे दत्तोपासक होते दररोज ते नित्यनियमाने दत्ताची पूजा करून गुरुचरित्र पोथीचा अध्याय वाचत. त्यांनी दत्तमहात्म्य सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला सत्पुरुषांच्या गाठीभेटी मध्ये त्यांना गोडी वाटत असे. पुण्यात न्या. रानडे, सार्वजनिक काका (गणेश वासुदेव जोशी) ही मंडळी पुणे सार्वजनिक सभेच्या माध्यमातून सार्वजनिक कार्यात सक्रिय होती. पण ती मवाळ होती. ब्रिटिशांशी बंड करणे हे त्यांना मुळीच अभिप्रेत नव्हते.

Vasudev Balwant Phadke – वासुदेव बळवंत फडके

पण वासुदेव बळवंत फडक्यांना देशबांधवांच्या हिताची तळमळ लागून राहिली होती. दुष्काळामुळे लोकांची अन्नात्र दशा झाली होती. सरकारवर अवलंबून नसलेली व राष्ट्रीय प्रवृत्तीचे शिक्षण देण्यासाठी Poona Native Institute ही संस्था स्थापन करून त्यांनी नवे विद्यालय स्थापन केले.

पण वासुदेव फडक्यांची क्रांतिकारक मते प्रसिद्ध असल्याने कित्येक विचारी पालक या शाळेत मुले पाठवीत नसत. इंग्रज अधिकाऱ्यांच्या प्रचंड पगारावर त्यांनी टीकास्त्र सोडले होते. आपण इंग्रजांना परत पाठविले पाहिजे, देश स्वतंत्र झाला पाहिजे असे ते जाहीरपणे सांगू लागले. सरकारची दडपशाही व अन्याय यावर ते जाहीर व्याख्याने देऊ लागले.

सुशिक्षित लोक देशासाठी काही करत नाहीत याचे त्यांना दु:ख होई. पुणे सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी लोकजागृतीचे काम चालू ठेवले.

रामोशी लोकांची संघटना व दरोडा सत्र – इ.स. १८७६ मध्ये महाराष्ट्रात दंगे उसळले. हे दंगे कर्जबाजारी लोकांनी सावकारांविरुद्ध सुरू केले होते. इ.स. १८७७-७८ या वर्षात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. लोकांची अन्नान्न दशा झाली. कॉलरा, देवी या रोगांनीही थैमान घातले. वासुदेव फडक्यांनी सर्व मराठी मुलुखांचा दौरा केला. लोकांची स्थिती पाहून त्यांना अत्यंत वाईट वाटले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव केला पाहिजे असे त्यांना वाटू लागले.

Vasudev Balwant Phadke – वासुदेव बळवंत फडके

त्यांचा लष्करी सामर्थ्यावर विश्वास होता. म्हणून ते शस्त्र विद्या शिकू लागले. तलवार, दांडपट्टा, भाला, नेमबाजी, बरची, बंदूक इत्यादी हत्यारे चालविण्याचे शिक्षण त्यांनी पुण्यातील वेताळपेठेतील लहुजी साळवे मांग व राणबा महार यांच्याकडून घेतले.

पांढरपेशा सुशिक्षित वर्ग हा आपल्या विचारांना प्रतिसाद देत नाही हे लक्षात आल्यामुळे त्यांनी रामोशी व भिल्ल लोकांशी संपर्क साधला. त्यांची संघटना निर्माण केली. सरकारी खजिने लुटण्यापेक्षा श्रीमंतांची घरे लुटण्यावर त्यांचा भर होता. कारण सरकारी खजिन्यांवर ब्रिटिशांच्या लष्कराचा कडक बंदोबस्त असे.

सावकारांच्या घरांवर दरोडे घालावयाचे, त्यांच्याकडील पैसा व धान्य लुटायचे व ते गरिबांना वाटायचे हे काम त्यांनी मोठ्या प्रमाणावर हाती घेतले. इ.स. १८७१ मध्ये प्रथम पत्नीच्या निधनानंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता.

फडक्यांचा जाहीरनामा – दरोड्यांची दखल ब्रिटिश सरकारने घेतली होती. पुण्याचा पोलीसप्रमुख मेजर डॅनियलने शोधमोहीम हाती घेतली. डॅनियलने फडकेवर पकड़ वॉरंट काढले. मुंबई सरकारने वासुदेव फडकेला पकडून देणारास ४००० रु. बक्षीस जाहीर केले पण त्याचा काही फायदा झाला नाही.

त्यास उत्तर म्हणून फडके यांनी मुंबईचा गव्हर्नर रिचर्ड टेंपलचे डोके कापून आणून देणारास ५००० रु. चे बक्षीस दिले जाईल असा जाहीरनामा पेशव्यांचा नवा पंतप्रधान या नात्याने जाहीर केला. हा जाहीरनामा इंग्रज सरकारची झोप उडवणारा होता व त्याचा प्रभाव महाराष्ट्रीयन जनतेवरही पडला होता.

फडक्यांचे नाव महाराष्ट्रात घराघरांत पोहचले होते. काही तर तो शिवाजी महाराजांचा अवतार आहे असे म्हणू लागले. त्याच्या पराक्रमाच्या खऱ्याखुऱ्या कथा लोक अभिमानाने सांगू लागले.

Vasudev Balwant Phadke – वासुदेव बळवंत फडके

क्रांतिकारक सेनेची स्थापना – १३ फेब्रुवारी १८७९ रोजी त्यांनी आपल्या पत्नीस जुन्नरला पाठविले व उठावाची तयारी सुरू केली. २० फेब्रुवारी रोजी त्यांचे विश्वासू अनुयायी व सहकारी पुण्याजवळ लोणीकंद येथे जमले. त्यावेळी क्रांतिकारक सेनेची स्थापना करण्यात आली. या समारंभास २०० पेक्षा अधिक लोक जमा झाले होते.

त्यावेळी उपस्थितांना पागोटी, फेटे व पैसाही दिला होता. त्यावेळी वासुदेव फडक्यांनी केलेल्या भाषणामुळे सर्व जण उत्साहित झाले होते. आपला लढा तूर्त सरकार, पोलीस व सावकार यांच्याशी असून आपणास शस्त्रे व पैसा हवा आहे असे त्यांनी सांगितले.

तलवारी, बंदुका वगैरे शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या क्रांतिसेनेने धामरी गावातील श्रीमंत मारवाड्यांची घरे लुटली होती. इ.स. १८७९ च्या फेब्रुवारी व मार्चमध्ये वासुदेव बळवंतांच्या नेतृत्वाखाली लुटीचे सत्र चालूच होते. त्यांच्या क्रांतिकारक सेनेतील बहुतांश जण इंग्रज सत्तेचा द्वेष करत.

Vasudev Balwant Phadke – वासुदेव बळवंत फडके

त्यांच्या क्रांतिसेनेत ३०० लोक होते, त्यात प्रामुख्याने रामोशी, कुणबी, मांग, कोळी, धनगर, चांभार, ब्राह्मण यांचा समावेश होता. आपल्या लुटीत स्त्रियांवर व लहान मुलांवर अत्याचार होता कामा नये याची ते दखल घेत असत. मराठी मुलखातील प्रत्येक गावच्या श्रीमंतांची यादीच त्यांच्याकडे होती.

ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड करण्यात त्यांना कोणताही पश्चात्ताप झाला नाही. नोव्हेंबर १८७९ मध्ये अमृत बझार पत्रिकेने म्हटले होते, ‘फडके म्हणजे देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तम महापुरुष..

वासुदेव बळवंत फडके यांना कैद व काळ्या पाण्याची शिक्षा – वासुदेव बळवंत फडके यांच्या सर्व हालचाली व दरोडे यांची वृत्ते सर्व भारतभर वर्तमानपत्रांद्वारा प्रसिद्ध झाली. त्यांच्या क्रांतिसेनेतील बंडखोर हे लढवय्या वर्गापैकी होते. गोपाळ मोरेश्वर साठे, विष्णू विनायक गद्रे, सीताराम गोकाक, गो.ह. कर्वे हे त्यांचे काही नामवंत सहकारी होत.

क्रांतिसेनेतील प्रत्येकातील लायकीप्रमाणे ४ ते १६ रु. पगार मिळे. त्यांना शस्त्रास्त्रे व दारूगोळा पुरविण्याचे काम स्वतः बळवंतरावांनी आपल्याकडे घेतले होते. खेड येथील सरकारी तिजोरीवर हल्ला करून ती लुटण्याचा बेत ठरला होता पण या गुप्त कटात वरकरणी सामील झाल्याचे दाखवून सरकारला ही माहिती आगाऊ पुरवून एका मुसलमानाने हा बेत हाणून पाडला. ब्रिटिश सरकारने वासुदेव फडक्यांविरुद्ध प्रचारमोहीम चालविली, त्यांची लुटारू दरोडेखोर अत्याचारी माथेफिरू अशा शब्दांत संभावना केली.

Vasudev Balwant Phadke – वासुदेव बळवंत फडके

त्यांना पकडण्याचे काम मे. डॅनियल यांच्याकडे सोपविले होते. त्याचा शोध घेण्यासाठी मे. डॅनियल सशस्त्र फौजेसह फिरू लागला. ते गाणगापूरला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गावाच्या बाहेर एक बुद्ध विहार होता. तेथे ते गाढ झोपले असताना त्यांना मेजर डॅनियलने पकडले. पुण्यात बेड्या घालून आणले व त्यांच्यावर खटला भरला. सरकारतर्फे त्यांच्यावर पुढील आरोप ठेवले होते.

१) अनधिकृत माणसे जमविणे.

२) दरोडे घालणे.

३) शस्त्रे बाळगणे

४) दारूगोळा जमविणे.

५) लोकांच्या मनात सरकारबद्दल द्वेष निर्माण करणे,

पुण्याच्या कोर्टात त्यांचे वकीलपत्र सार्वजनिक काकांनी (वासुदेव गणेश जोशी) घेतले होते. त्यांच्यावरील खटल्याचे काम चालू असताना लोक गर्दी करत. राष्ट्रवादी भावनेच्या निर्मितीचेच ते जणू चिन्ह होते. सरकारतर्फे अनेकांच्या साक्षी झाल्या. पण वासुदेवातर्फे कोणाचीही साक्ष झाली नाही.

त्यांनी स्वतः आपले निवेदन कोर्टात देऊन ब्रिटिश सरकार भारतीयांवर कसा अन्याय करते याचा पाढाच जणू वाचला. दुष्काळाच्या प्रश्नांकडे ब्रिटिश सरकार कसे दुर्लक्ष करते हेही त्यांनी स्पष्टपणे मांडले. पण न्यायालयाने त्यांना काळ्या पाण्याची (जन्मठेप) शिक्षा ठोठावली, वासुदेव बळवंतांना ही शिक्षा ऐकूण काहीच वाटले नाही.

त्यांची बेडर वृत्ती पाहून न्यायाधीश पण स्तिमीत झाले. फडक्यांचे अपीलही नामंजूर करण्यात आले. त्यांना जन्मठेपेसाठी अंदमानात पाठविण्यात आले. (३ जानेवारी १८८०) त्यांचा देशाभिमान व धैर्य यामुळे भारतीयच नव्हे तर युरोपियन लोकांच्याही मनावर छाप पडली होती. वासुदेव बळवंतांच्या शिक्षेबरोबरच बाकीच्या आरोपींना वेगवेगळ्या मुदतीच्या सश्रम कारवासाच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या होत्या.

Vasudev Balwant Phadke – वासुदेव बळवंत फडके

वासुदेव बळवंत फडके यांचे निधन – (१७ फेब्रुवारी १८८३) एडन येथील हवामान अत्यंत उष्ण असल्याने ते त्यांना मानवले नाही. एडनच्या तुरुंगातून पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. त्यांना कडक बंदोबस्तात ठेवले गेले. त्यांच्या आजारपणाकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.

तुरुंगातील जीवनाचा त्यांना वीट आला होता. १७ फेब्रुवारी १८८३ रोजी एडनच्या तुरुंगातच त्यांचे निधन झाले.  तुरुंगातील अधिकाऱ्यांनीच एडन येथे त्यांच्या प्रेतावर अग्निसंस्कार केला. वासुदेव फडक्यांना नैसर्गिक मरण आले या गोष्टींवर जनतेने मात्र विश्वास ठेवला नाही.

इंग्रजांनी त्यांना गोळी घालूनच ठार केले असावे असाच संशय लोकांच्या मनात होता.  त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सहकाऱ्यांची पण वाताहत झाली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी गोपिकाबाई फडके यांनी प्रदीर्घ काळ (इ.स. १९४०) वैधव्यात जीवन काढले.

Vasudev Balwant Phadke – वासुदेव बळवंत फडके

श्री. म. माटे यांनी ‘उपेक्षितांचे अंतरंग’ या ग्रंथात फडक्यांनंतर त्यांच्या कुटुंबाची जी वाताहत झाली त्याचे चित्र मांडले आहे. इंग्रज राज्यकर्त्यांनी फडके यांना ‘आद्य क्रांतिकारकच’ मानले होते. ज्या काळात ‘स्वातंत्र्य’ हा शब्दच उच्चारण्याची परवानगी नसताना ते ध्येय त्यांनी उघड घोषित करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड केले.

वासुदेव बळवंतांच्या बंडाचा इंग्रज राज्यकर्त्यांवर झालेला परिणाम म्हणजे त्यांच्यापैकी एकाने (ए.ओ. ह्यूम) केलेली काँग्रेसची स्थापना होय.  त्यांच्या बंडामुळेच आपण परकीय सत्तेविरुद्ध लढा देऊ शकतो ही भावना लोकांच्या मनात निर्माण होण्यास मदत झाली.

फडके यांच्या कार्यामुळे, त्यागामुळेच स्वातंत्र्यवाद्यांची एक पिढीच निर्माण होण्यास मदत झाली. वासुदेव फडके यांच्या जीवनावर व त्यांनी केलेल्या बंडावर अनेक नाटके लिहिली गेली व त्याचे प्रयोग महाराष्ट्रात खूप लोकप्रियही झाले. ते दत्तउपासक होते. त्यांनी ‘दत्त माहात्म्य’ हा ७००० ओव्यांचा ग्रंथ लिहिला होता.

ब्रिटिश राज्यकर्त्यांनी वासुदेव बळवंतला हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी बंड करणारे पहिले क्रांतिकारकच मानले होते. त्यांच्या देशभक्तीमुळेच त्यांच्यानंतरचे कित्येक क्रांतिकारक त्यांना आपले स्फूर्तिस्थान मानत. दामोदरपंत चापेकर, वि. दा. सावरकर यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली होती.

डॉ. विपिन बिहारी, मुजुमदार यांनी वासुदेव बळवंत फडके हेच ‘आनंदमठ’ या कादंबरीचे स्फूर्तिदाते होते असे एका ग्रंथात म्हटले आहे. वासुदेव बळवंत फडके यांनी पेटेवलेली स्वातंत्र्याकांक्षेची ज्योतच पुढे महाराष्ट्र व भारतातील पुढील कित्येक पिढीतील तरुणांच्या मनात रोवली गेली.

लॉर्ड माऊंटबॅटन यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या चळवळीचा उगम टिळकांच्या नव्हे तर वासुदेव बळवंत फडक्यांच्या कार्यात आहे असे म्हटले होते. फडके यांचे बंड अयशस्वी झाले पण त्यामुळे त्याचे महत्त्व कमी होत नाही. प्रख्यात इतिहासकार रामचंद्र मुजुमदार म्हणतात, ‘इ.स. १८५७ सालच्या उठावानंतरच्या काळात हिंदुस्थानातील ब्रिटिश राज्य उलथून पाडण्याच्या उघडउघड उद्दिष्टाने पहिली गुप्त क्रांतिसंस्था संघटित करण्याचे श्रेय वासुदेव बळवंत फडके यांचेच आहे.’

Vasudev Balwant Phadke – वासुदेव बळवंत फडके

‘महाराष्ट्राचा रॉबिनहूड’ म्हणून ते ओळखले जातात. पुण्यातील नागरिक त्यांना ‘दुसरा शिवाजी’ म्हणत. ‘क्रांतिकारकांचा जनक’ म्हणून ते ओळखले जातात.असे हे महान स्वतंत्रसेनानी महाराष्ट्राचा पावन भूमिवर जन्मले. त्यांना त्रिवार वंदन. 

Chhava

Leave a Comment