Veer Savarkar
क्रांतिवीर विनायक दामोदर सावरकर हे एक क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानि कवी, समाजसुधारक, राजकारणी तसेच प्रतिभावंत साहित्यिक, इतिहास संशाधक होते. त्यांचा जन्म २८ मे १८८३ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधील भगूर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर आणि आईचे नाव राधा होते. त्यांच्या आईचे ते लहान असतानाच निधन झाले.
Veer Savarkar – वीर सावरकर
इ.स. १८९८ मध्ये प्लेगच्या साथीने त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला. त्यांना गणेश सावरकर हे मोठे बंधू, नारायण सावरकर धाकटे बंधु व मैना नावाची लहान बहीण होती. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांचा सांभाळ ते थोरले बंधू गणेश सावरकर आणि येसु वहिणी यांनी केला. प्रारंभिक शिक्षणासाठी वि. दा. सावरकरांना इ.स. १८८९ मध्ये गावातील शाळेमध्ये दाखल करण्यात आले.
येथेच इयत्ता पाचवी पर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी ते नाशिकला गेले. या कालावधीतच त्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण झाली. इ.स. १९०१ मध्ये ते मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाले. यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांचा अनेक लोकांशी संपर्क आला. लोकमान्य टिळकांशी त्यांची ओळख झाली.
टिळकांच्या प्रेरणेने त्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती विषयी आत्मियता प्रखर झाली. येथे त्यांनी आपल्या समविचारी विद्यार्थ्यांचा गट निर्माण केला. तसेच या काळात पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील विद्यार्थ्यांशीही जवळीक निर्माण झाली. नंतर ते उच्च शिक्षणाकरिता लंडनला गेले होते.
Veer Savarkar – वीर सावरकर
राजकीय कार्य
मित्रमेळा संघटनेची स्थापना : इ.स. १८९४ मध्ये चाफेकर बंधुंनी ‘हिंदु धर्म संरक्षण समिती ची स्थापना केली होती. चाफेकर बंधूनी २२ जून १८९७ ला वाल्टर चार्ल्स रॅडवरगोळ्या झाडल्या. ‘रेंड’ या अधिकाऱ्याच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली व नंतर फासावर चढविण्यात आले.या घटनेनंतर ब्रिटिशांविरूद्ध जनतेमध्ये रोष वाढला. या घटनेनंतर सावरकारांनी ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावण्याची प्रतिज्ञा केली.
हिच प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन इ.स. १९०० मध्ये एक संघटन बनविले व त्याला ‘मित्रमेळा’ असे नाव दिले. मित्रमेळाच्या माध्यमातून त्यांनी ‘शिवाजी उत्सव’, “गणेश उत्सव’ इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. यामध्ये तरूणांना सशस्त्र क्रांती करण्याचे शिक्षण दिल्या जात होते. सावरकरांच्या वर्तृत्वाने प्रभावित होऊन अनेक तरुण कार्यकर्ते संघटनेशी जोडले गेले.
विदेशी वस्त्रांची होळी : इ.स. १९०५ मध्ये विदेशी वस्त्रांची होळी करण्याचा निर्णय जहालवादी नेत्यांनी घेतला होता. तेव्हा सावरकर बी.ए. अंतीम वर्षाला होते. त्यांनी या निर्णयाला समर्थन व्यक्त करीत यामध्ये सक्रीय सहभाग घेतला. २२ ऑगस्ट १९०६ मध्ये त्यांनी पुणे येथे सार्वजनिक वस्त्रांच्या होळीचे आयोजन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोकमान्य टिळकांनी भूषविले होते. याच घटनेतून सावरकरांना लोकप्रसिद्धी मिळाली. परंतु या घटनेनंतर त्यांना फर्ग्युसन कॉलेजमधून काढून टाकण्यात आले. नंतर त्यांनी आपले बी.ए. चे शिक्षण मुंबई विद्यापीठामधून पूर्ण केले.
Veer Savarkar – वीर सावरकर
Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा
Prabodhankar Thackeray – प्रबोधनकार ठाकरे
अभिनव भारत संघटनेची स्थापना : बी.ए. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सावरकरांनी मित्रमेळा संघटनेचे ‘अभिनव भारत’ संघटनेत इ.स. १९०४ ला रूपांतर केले. ही गुप्तप्रकारची क्रांतिकारी संघटना होती. इटलीतील क्रांतिकारक जोसेफ मॅझीनी ह्यांच्या ‘यंग इटली’ या संघटनेच्या धर्तीवर ही संघटना स्थापित करण्यात आली होती. या संघटनेचा मुख्य उद्देश तरुणांना सशस्त्र क्रांतीसाठी तयार करणे, त्या पद्धतीचे त्यांना शिक्षण देणे ब्रिटिशांना भारताबाहेर हाकलून लावणे असे होते.
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सावरकरांनी ठिकठिकाणी फिरून तरूण कार्यकर्ते संघटित करण्याचे कार्य केले. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर या संघटनेची कोणतीही आवश्यकता नाही असे समजून १० मे १९५२ रोजी या संघटनेचे विसर्जन करण्यात आले होते. त्याचा समापन सोहळा ‘पूणे’ या शहरात संपन्न झाला होता.
लंडनमधील वास्तव्य: बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण घेण्याकरिता सावरकरांची इच्छा लंडन येथे जाण्याची झाली. पण आर्थिक स्थिती बेताची जून असल्यामुळे त्यांना लडनमध्ये जाणे शक्य नव्हते. तेव्हा श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी ते १९०६ मध्ये लंडनला गेले. लंडनला पोहोचल्यानंतर सावरकर श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या ‘इंडिया हाऊस’ येथे थांबले. त्यांनी सावरकरांची सर्वतोपरी मदत केली.
Veer Savarkar – वीर सावरकर
इंडिया हाऊस मध्ये राहत असताना सावरकरांना समविचारी तरूण मित्र मिळाले. काही काळानंतर त्यांनी येथे ‘फ्रि इंडिया सोसायटी’ ची स्थापना केली. यामध्ये भाई परमानंद, मदनलाल धिंग्रा, हरनामसिंह, कोरगांवकर, लाला हरदयाल इत्यादी सदस्य होते. या काळात सावरकरांनी अभिनव भारत संघटनेचे येथूनच काम पाहिले.
लंडनमध्ये सावरकरांनी इटली येथील प्रसिद्ध वीर ‘जोसेफ मॅझीमी यांच्यापासून प्रभावित होऊन ‘मॅझीनीचे आत्मचरित्र’ मराठीत भाषांत केले. इ.स. १९०६ मध्ये ‘शिखांचा स्फुर्तीदायक इतिहास’ पुस्तकाची रचना केली. सखोल अभ्यास करून सावकरांनी इ.स. १८५७ च्या उठावावर विश्लेषणात्मक १८५७ चे स्वातंत्र्यसमर’ नावाच्या ग्रंथांची रचना केली. इ.स. १९०७ मध्ये लंडन येथे इ.स. १८५७ च्या उठावाची अर्धशताब्धी वर्ष साजरे केले. श्यामजी कृष्ण वर्मा हे फ्रान्स येथे गेल्यावर सावरकरांवर ‘इंडिया हाऊस’ च्या संचालनाची जबाबदारी आली. ती त्यांनी व्यवस्थीतपणे पार पाडली.
लंडन येथे असताना त्यांच्यावर भारतामध्ये ब्रिटिश शासनाच्या विरूद्ध कट रचने, अवैध हत्यारांची तस्करी करणे, जॅक्सन तसेच कर्जन वायली यांच्या हत्येशी त्यांचा असलेला संबंध, सरकारविरोधी षडयंत्र करणे व तसे करण्यासाठी तरूणांना भडकाविणे, लंडन येथे शस्त्रास्त्र संकलन, येथे राजद्रोहात्मक केलेली वक्तव्य अशा स्वरूपाचे आरोप झाले. या आरोपाखाली नंतर त्यांना बंदी बनवून खटला चालविण्यासाठी भारतात आणण्यात आले.
Veer Savarkar – वीर सावरकर
१ जुलै १९१० रोजी ‘मोरिया’ (Moriya) नावाच्या जहाजातून सावरकरांना लंडन येथून भारतात आणतअसतांना मॉर्सेलिस बेटाजवळ त्यांनी बोटीतून उडी मारली व समुद्रातून पोहत जाऊन किनारा गाठला. परंतु फ्रेंच रक्षकांच्या भाषेच्या समस्येमुळे परस्परांमध्ये संभाषण होऊ शकले नाही. सावरकरांचा हा प्रयत्न फसला.
भारतात आल्यावर त्यांच्यावर खटला चालविण्यात आला. २४ डिसेंबर १९१० मध्ये सावरकरांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच जॅक्सन हत्याकांडांवर न्यायालयाने निकाल देत इ.स. १८११ मध्ये सावरकारांना आजन्म काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली.
अंदमानमधील दिवस : सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा सुनावल्यानंतर अंदमान येथील सेल्युलर कारागृहात पाठविण्यात आले होते. त्यांना गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेल्या कैद्यांच्या खोलीत ठेवण्यात आले. कारागृहात त्यांचे मोठे बंधु गणेश सावरकर यांना सुद्धा बंदी बनविण्यात आले होते.
Veer Savarkar – वीर सावरकर
सावरकर बंधुंनी तेथील कैद्यांच्या जेवणामध्ये सुधार व्हावी, चांगले अन्न मिळावे, इतर सुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी मागण्या सादर केल्या. यावरून त्यांना वेगळे करण्यात येऊन इतर कैद्यांच्या संपर्कात न येण्यासाठी ‘एकांतवासाची’ तेरा महिन्याची शिक्षा दिली. सावरकरांनी अंदमानच्या कारागृहामध्ये प्रौढ शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. या ठिकाणी त्यांनी ‘स्वाध्याय मंडल’ चे संघटन केले.
तेथील कैद्यांना साहित्य, राजनीती, इतिहास, दर्शन इत्यादी विषयांचे शिक्षण देण्यात येत होते. या काळात त्यांना आशुतोष लाहिडी आणि भाई परमहंस या व्यक्तींनी मोलाचे सहकार्य केले. तुरूंगामध्ये सावरकरांनी कवितांचीही रचना केली होती. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार व खुद्द त्यांच्याच मुत्सद्दीपणाने त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला.
त्यांना आणि त्यांचे मोठे बंधु गणेश सावरकर यांना १० फेब्रुवारी १९२१ रोजी भारतामध्ये पाठविण्यात आले. अंदमानातून सुटका झाल्यानंतर सावरकरांना सुरुवातीला कलकत्ता येथील कारागृहात ठेवण्यात आले. त्यानंतर इ.स. १९२४ मध्ये रत्नागिरी येथे पाठविण्यात आले. येथे सावरकर नरजकैदेत होते.
Veer Savarkar – वीर सावरकर
रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर न जाणे तसेच जिल्ह्याबाहेर भ्रमण न करणे, राजकारणामध्ये सहभाग न घेणे या अटींवरसावरकरांना तुरूंगातून मुक्त करण्यात आले होते. पण त्यांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरण्याची मुभा मात्र देण्यात आली होती.
हिंदू महासभेचे कार्य : सावरकर अंदमानातून सुटका झाल्यानंतर सुमारे १३ वर्षे रत्नागिरीमध्ये नजरकैदेत होते. मात्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरण्याचे स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले होते. यास सुमारास सावरकरांनी हिंदू महासभेचे कार्य केले. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले.
वेगवेगळ्या भागातील दौरे नवीन कार्यकर्त्यांची भरती, तरूणांना महासभेचे सदस्यत्व देणे, हिंदूची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना इत्यादी मार्गानी सावरकरांनी हिंद महासभेचे कार्य पुढे नेले. हिंदू धर्माचे आधुनिकता आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि हिंदू संस्कृती यांचे मिश्रण करून नवीन हिंदू धर्माची उभारणी व्हावी, अशी सावकरांची धारणा होती.
Veer Savarkar – वीर सावरकर
सामाजिक व धार्मिक सुधारणेचे कार्य
सावरकरांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून सामाजिक व धार्मिक सुधारणा करण्याकरिता लढा दिला.
जातिभेद निर्मूलन :जातिभेद मिटावा सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी यासाठी सावरकरांनी प्रयत्न केले. हिंदू समाजाच्या अधःपतनासाठी चातुर्वर्ण्य जातिव्यवस्था जबाबदार आहे, असे सावरकरांचे मत होते. हिंदू धर्मातील विषमतावाद समाजरचनेमुळे हिंदू समाज विखुरला जात आहे, असे त्यांना वाटायचे.
यात सुधारणा घडविण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेला सुरुवात केली. जातिभेद, अंघश्रद्धा, धर्मभोळेपणा यावर त्यांनी कडाडून टीका केली. जातिभेद निर्मूलनाकरिता त्यांनी आंतरजातीय विवाह लावले, सहभोजने आयोजित केले. सामाजिक भोजनालय सुरू केले. या कार्यासाठी त्यांना स्वामी समतानंदांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले होते.
२६ एप्रिल १९३९ मध्ये सावरकरांच्या अध्यक्षतेखाली ‘अखिल मुंबई इलाखा दलित परिषद’ झाली होती. सावरकरांनी ‘अस्पृश्य’ शब्दाऐवजी ‘पूर्वास्पृश्य या शब्दाचा वापर केला होता. त्यांनी समाजसुधारणा करताना हिंदुत्वाचे समर्थक दुःखावतील अशीकाजील भीती बाळगली नाही. जे दोष समाजव्यवस्थेमध्ये दिसले ते प्रामाणिकपणे दाखवून दूर करण्याचा प्रयत्न केला.
Veer Savarkar – वीर सावरकर
ते म्हणतात की, आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे. ते सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिनत्य विविध जातींमध्ये दिसून येत नाही. जात मानने ही मूळ चूक, त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रम्हदेवाच्या बेंबीपासून अमूक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खऱ्या मानून त्या त्या जातीच्या अंगी हे ते गुण उपजतच आहेत.
हे मानने ही घोडचुका अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्चनीचता त्या संतानात भोगावयास लावणे ही पहाड चूक. ‘ जातिव्यवस्था मोडण्याकरिता आधी सात बेड्या मोडायला हव्यात. हे सांगताना ते लिहितात, पोथीजात जातिभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्या सात बेड्या म्हणजे १) वेदोक्त २) व्यवसायबंदी, ३) स्पर्शबंदी, ४) सिंधुबंदी, ५) शुद्धीबंदी, ६) रोटी बंदी, ७) बेटीबंदी.
Veer Savarkar – वीर सावरकर
अनिष्ट रूढी, परंपरांचा विरोध: सावरकरांचा विज्ञानवादी दृष्टिकोन होता. समाजातील अनिष्ट चालीरीती, परंपरा बंद व्हाव्या यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यज्ञ, गोपूजा. समुद्रगमन बंदी. स्पर्शबंदी यावर त्यांनी टीका केली. राजकीय परिवर्तन पुरेसे नसून सामाजिक परिवर्तन झाले पाहिजे. या मताचे सावरकर होते. प्राचीन सनातनी धर्मग्रंथांवर सुद्धा सावरकरांनी टीका केली.
मंदिर प्रवेश चळवळ : अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश निषिद्ध होता. सावरकरांनी सर्वांना मंदिरामध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न केले. रत्नागिरी येथील श्रीमंत भागोजी शेठ कीर’ यांच्या सहकार्याने ‘पतितपावन’ मंदिर बांधले. हे मंदिर सर्व समाजातील लोकांसाठी खुले करण्यात आले होते. इ.स. १९२५ मध्ये त्यांच्या उपदेशामुळे शिरगाव येथील हनुमान मंदिराच्या गुरवाने प्रदक्षिणेत अस्पृश्यांना समाविष्ट करून घेतले.
सावरकारांच्या प्रयत्नामुळे इ.स. १९२९ मध्ये रत्नागिरीचे विठ्ठल मंदिर तसेच इ.स. १९३१ मध्ये भागेश्वर मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळाला. नाट्यगृहामध्ये अस्पृश्यांना प्रवेशाची अनुमती नव्हती. सावरकरांनीअस्पृश्यांना नाट्यगृहामध्ये प्रवेश मिळवून दिला तसेच अस्पृश्यासाठी नाट्यप्रवेश विनामूल्य केला होता.
Veer Savarkar – वीर सावरकर
स्पृश्य-अस्पृश्यांच्या सहशिक्षणाचा पुरस्कार : स्पृश्य-अस्पृश्यांनी एकाच ठिकाणी शिक्षण घ्यावे, या मताचे सावरकर होते. स्पृश्य-अस्पृश्यांना एकत्र शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनाला यश प्राप्त होऊन स्पृश्य-अस्पृश्य समाजातील बालके सोबत शिकू लागली. अस्पृश्यांना वेगळे करून हिंदू धर्माचा हास होईल, असे मत सावरकरांचे होते. म्हणून सर्व समाजघटकांना एका सूत्रामध्ये बांधण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला होता.
सावरकरांवर धर्मद्रोहाचा आरोप : सावरकरांनी चालविलेल्या जात्यच्छेदन चळवळीने अस्वस्थ झालेल्या ब्राम्हणांनी लोणी येथे झालेल्या सनातनी परिषदेत सावरकरांना ‘धर्मद्रोही’ठरवून त्यांना ‘पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते’, असा ठराव मांडला. सावरकरांनी त्यावर शिवशाही अथवा पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत आमच्यासारख्या हिंदू संघटकांना हत्तीच्या पाठीवर अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव अधिक होता’ असे सडेतोड उत्तर दिले होते.
भट-पंडितांवर टीका : सावरकरांनी हिंदूधर्म सुधारणेला अग्रक्रम दिला. भट-पंडितांमुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्याकरिता भट-पंडितांवर टीका करताना त्यांनी लिहिले, ‘भटशाही संपविण्यासाठी पूजा, पाठ, गौरी, गणपती, सोयरसुतक, संक्रांत, दिवाळी, दसरा, द्वादशी इत्यादी धार्मिक कार्यक्रमाला भटांना बोलावणे बंद करून ‘भटशाही’ संपवावी.
काशीतील अपरिवर्तनीय ब्राम्हणांविषयी ते म्हणतात, “काशीत दोन महासंमेलने भरली. एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन. माकडे परिवर्तनीय तरी आहेत. पण सनातनी तर परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत. अशा वागण्यामुळे निदान काशीच्या भाकड़ काल, वेळ, महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून तेथील माकडेच त्या पंडितांची विकसित श्रेणी आहेत, हे म्हणजे क्रमप्राप्त आहे.”
Veer Savarkar – वीर सावरकर
सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन : सावरकर हिंदूधर्माला अंधश्रद्धेतून बाहेर काढून विज्ञानवादी बनविण्याचे सतत प्रयत्न करीत होते. ते फक्त विज्ञानवादी विचार मांडून थांबले नाहीत तर ते प्रत्यक्ष कृतीतही उतरविले. या संदर्भात त्यांचे मृत्यपत्र वाचनिय आहे. ते लिहितात, “माझे प्रेत शक्यतो विद्युत चितेवरच जाळण्यात यावे.
जुन्या पद्धतीप्रमाणे ते शक्यतो माणसांनी खांद्यावरून किंवा कोणत्याही प्राण्याच्या गाडीतन नेऊ नये, तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्यूत स्मशानात नेले जावे. माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने किंवा व्यवसाय बंद करू नयेत. कारण त्याने समाजाला फार त्रास होतो. घरोघरीच्या संसारासाठी दैनिक आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्याने अडथळा होतो.
माझ्या निधनानिमित्त कोणीही सुतक, विटाळ किंवा ज्या योगे कुटुंबियांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो अशा कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत किंवा पिंडदान, त्या पिंडाला काकस्पर्श होईतो वाट पाहत बसणे इत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत वगैरे.”
Veer Savarkar – वीर सावरकर
सावरकरांचा हिंदुत्ववाद
सावरकरांच्या कल्पनेतील हिंदुराष्ट्र : हिंदू संस्कृती जोपासावी, त्याचा प्रचार-प्रसार व्हावा, अखंड हिंदूराष्ट्राची निर्मिती व्हावी अशी सावरकरांची मनिषा होती. सर्व भारतीयांना एका हिंदू धर्माच्या चौकटीत आणण्याखेरीज सामाजिक, राजकीय, आर्थिक विकास होणार नाही, असे त्यांचे मत होते. आपली भाषा, वर्ण, संस्कृती, सण-उत्सव, भूमी एक असल्यामुळे आपण या घटकांतर्गत एकच आहोत.
यातील अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी यांना वेगळे करून सावरकरांनी आपली हिंदुत्वाची परिभाषा प्रतिपादीत केली आहे. सावरकरांच्या मते, इंग्रज, फ्रेंच, जापानी, अमेरिकन इत्यादी राष्ट्रांना एका राष्ट्राची पदवी का मिळाली? कारण तो सर्व जनसमुदाय स्वतःला एका राष्ट्रांतर्गत प्रतिनिधीत्व करतो. उदा. रशियनाचे रशियन, चीनचे चिनी या स्वरूपामध्ये स्वत:ला ते मांडतात. त्यांची भूमी, वर्ण एकच आहे.
म्हणून हे सर्व घटक एका राष्ट्राची निर्मिती करतात. त्या ठिकाणी बहुसंख्य लोक एक संस्कृती, वर्णाचे असल्यामुळे त्यांचे तिथे राष्ट्र निर्माण झालेले आहे. म्हणूनच भारतामध्ये बहुसंख्य हिंदू धर्मीय असून सर्वांना एकत्र येऊन येथे राष्ट्रनिर्मिती करावयाची आहे. हिंदूचे हिंदुस्थान असायला पाहिजे, असे मत सावरकरांचे होते.
Veer Savarkar – वीर सावरकर
अखंड हिंदुस्थानची संकल्पना : सावरकरांनी अखंड हिंदुस्थानची संकल्पना मांडलेली आहे. त्यांच्या मते, प्राचीन काळामध्ये ज्या ज्या भागामध्ये हिंदू संस्कृती वाढली, जगी तो संपूर्ण भाग हिंदू संस्कृतीच्या निर्मितीचा भाग आहे. अखंड हिंदुस्थान हिंदूच्या ताब्यात यावा असे सावरकरांना वाटत होते. पाकिस्तानच्या निर्मितीला सावरकरांनी प्रारंभापासूनच विरोध केलेला होता.
धर्मातरण विषयक सावरकरांचे विचार : सावरकरांच्या मते, एक हिंदू जेव्हा धर्मपरिवर्तन करतो तेव्हा तो हिंदुस्थानला स्वतःची जन्मभूमी मानीत नाही. त्यांची श्रद्धा, भक्ती, तेथील (जो धर्म ज्या भूमीतला आहे) राष्ट्राप्रती असते. धर्मांतरण थांबले आणि हिंदू बहुमतात राहिले तर अखंड हिंदुस्थान बनेल. त्याउलट जर इथे इतर धर्मीय बहुमतात किंवा जनसंख्येच्या किमान संख्येनुसार राहिले तर ही भूमी एक राष्ट्र म्हणूनराहणार नाही.
साहित्य संपदा : क्रांतिकारक, राजकारणी, समाजसुधारक, प्रतिभावंत साहित्यिक, कवी, निबंधकार, लेखक, ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ असे अष्टपैलू व्यक्तिमत्व सावरकरांचे होते. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी ‘फटका’ नामक काव्याची रचना केली. लंडन, अंदमानची काळकोठडी आणि रत्नागिरी इत्यादी ठिकाणच्या वास्तव्यात त्यांनी अनेक साहित्य निर्माण केले होते.
Veer Savarkar – वीर सावरकर
सावरकरांनी भाषाशुद्धीचे महत्त्वाचे कार्य केले होते. १५ ऑक्टोबर १९३८ ला मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांच्या ‘सागरा प्राण तळमळला’, ‘हे हिंदू नृसिंहा’, ‘प्रभो शिवाजी राजा’, ‘जयोस्तृते’, ‘तानाजीचा पोवाडा’ इत्यादी या कविता अधिक लोकप्रिय झाल्या.
त्यांची साहित्य निर्मिती खालीलप्रमाणे आहे.
इतिहास – ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’, ‘भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने’, ‘हिंदूपदपादशाही’
कथा – ‘सावरकरांच्या गोष्टी भाग-एक, ‘सावरकरांच्या गोष्टी भाग दोन’
कादंबरी – ‘काळेपाणी’, ‘मोपाल्यांचे बंड’
आत्मचरित्रपर – ‘माझी जन्मठेप’, ‘शत्रूच्या शिबिरात’, ‘अथांग’ (आत्मचरित्र पूर्वपिठीका)
Veer Savarkar – वीर सावरकर
हिंदूत्ववाद – ‘हिंदूत्व’, ‘हिंदूराष्ट्र दर्शन’, ‘हिंदूत्वाचे पंचप्राण’
लेखसंग्रह – ‘गरमागरम चिवडा’, ‘गांधी गोंधळ’, ‘जात्यूच्छेदक निबंध’, ‘तेजस्वी तारे’, ‘मॅझिनीच्या आत्मचरित्राची प्रस्तावना’, ‘लंडनची बातमीपत्रे’, ‘विज्ञाननिष्ठ निबंध’, ‘सावरकरांची राजकीय भाषणे’, ‘सावरकरांची सामाजिक भाषणे’
नाटके – ‘संगीत उत्तरक्रिया’, ‘संगीत उःशाप’, ‘बोधिवृक्ष (अपूर्ण)’, “संगीत सन्यस्तखड्ग’
महाकाव्ये – ‘कमला’, ‘गोमांतक’, ‘विरहोच्छवास’, ‘सप्तर्षी’
स्फूट काव्य – ‘सावरकरांच्या कविता’, ‘चाफेकरांचा फटका’
मृत्यू : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी सुमारे साठ वर्ष स्वातंत्र्य व सुराज्य यासाठी अथक परिश्रम घेतले. १ फेब्रुवारी १९६६ ला अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ ला दादर, मुंबई येथे त्यांची प्राणज्योत मावळली. प्रसिद्ध लेखक व पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी सावरकरांचा गौरव करताना ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी दिली होती.