Vibhakti – विभक्ती

विभक्ती-Vibhakti
                                                                            Vibhakti विभक्ती

वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दांशी म्हणजे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी काही ना काही संबंध असतो, या संबंधाला कारक असे म्हणतात.

वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात, त्यांना कारकार्थ असे म्हणतात आणि क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात, त्या संबंधांना उपपदार्थ असे म्हणतात.

अशा प्रकारे नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकरांनी दाखविले जातात त्या विकरांना विभक्ती असे म्हणतात.

Vibhakti – विभक्ती

विभक्तीचे प्रकार 

प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते. यात क्रियापद हा प्रमुख शब्द होय. ही क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो. त्याला कर्ता असे म्हणतात. ही क्रिया कोणावर घडली, कोणी केली, कशाने केली, कोणासाठी केली, कोठून घडली, कोठे किंवा केव्हा घडली, हे सांगणारे शब्द वाक्यात असतात. नामांचा क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध अशा 8 प्रकारचा असतो. म्हणून विभक्तीचे एकंदर आठ प्रकार मानले जातात.

विभक्तीचे अर्थ 

विभक्तीचे मुख्य कारकार्थ 6 आहेत 

कर्ता : क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो. त्याला कर्ता असे म्हणतात. कर्त्याची विभक्ती केव्हा केव्हा प्रथमा असते. प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता होय.

उदा: राम आंबा खातो.

कर्म : कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडली हे सांगणारा शब्द म्हणजे कर्म. कर्माची विभक्ती द्वितीया. म्हणजेच द्वितीयेचा कारकार्थ कर्म होय. (हे प्रत्यक्ष कर्म असते) प्रत्यक्ष कर्माची विभक्ती द्वितीया असते तर अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती संप्रदानी चतुर्थी असते.

उदा: राम रावणास मारतो.

करण : वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते, किंवा ज्याच्या साधनाने घडते, त्याला करण असे म्हणतात. करण म्हणजे साधन. तृतीयेचा मुख्य कारकार्थ करण आहे.

उदा: आई चाकूने भाजी कापते.

संप्रदान : जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते, तेव्हा ते दान ज्याला करण्यात येते, त्याच्या वाचक शब्दाला किंवा देणे, बोलणे, सांगणे, इ. अर्थाच्या क्रिया ज्याला उद्देशून घडतात, त्या वस्तूला किंवा स्थानाला संप्रदान असे म्हणतात. चतुर्थीचा मुख्य कारकार्थ संप्रदान आहे.

उदा: मी गुरुजींना दक्षिणा दिली.

अपादान : क्रिया जेथून सुरु होते, तेथून ती व्यक्ती वा वस्तू दूर जाते. म्हणजे क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग दाखवायचा असतो, त्यास अपादान असे म्हणतात, पंचमीचा कारकार्थ अपादान आहे.

उदा: मी शाळेतून आताच घरी आलो.

अधिकरण: वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली हे क्रियेचे स्थान किंवा काळ दर्शविणा-या शब्दाच्या संबंधास अधिकरण असे म्हणतात. सप्तमीचा मुख्य कारकार्थ अधिकरण आहे.

उदा: दररोज सकाळी मी शाळेत जातो.

षष्ठी : विभक्तीत शब्दांचा संबंध सामान्यतः क्रियापदाशी येत नाही. दुस-या नामाशी येतो. षष्ठीचा अर्थ संबंध. केव्हा केव्हा षष्ठीलाही कारकार्थ असलेला आढळतो.

उदा: रामाची बायेको होती सीता.

संबोधन : संबोधनाचा उपयोग हाक मारताना करतात. जे नाम संबोधन म्हणून वापरले जाते, त्याला विकर होती व प्रत्ययही लागतात. म्हणून संबोधन ही आठवी विभक्ती आहे.

उदा: रामा, इकडे ये.

अशा प्रकारे विभक्तीचे प्रत्यय, विभक्ती व प्रमुख कारकार्थ पुढीलप्रमाणे आहेत 

Vibhakti

 

Vibhakti-che-pratyay

विभक्ती अर्थावरून मानावी की, प्रत्ययावरून 

उदा:

राम आंबा खातो.

रामाने चोरास मारले.

वरीलपैकी पहिल्या वाक्यात आंबा या शब्दमध्ये द्वितीया विभक्ती असून कारकार्थ कर्म आहे. येथे आंबा शब्दास स, ला, ते असे प्रत्यय लागलेले नाहीत. मात्र तरीही ती द्वितीया विभक्ती आहे (अप्रत्ययी ). दुस-या वाक्यात चोरास या शब्दामध्ये देखील द्वितीया विभक्ती आहे, असे आपण निर्विवादपणे म्हणतो. कारण येथे हा प्रत्यय लागलेला आहे (सप्रत्ययी). दोन्ही वाक्यांमध्ये अनुक्रमे आंबा व चोरास या शब्दांना लागलेल्या विभक्ती प्रत्ययांचा कारकार्थ कर्म आहे.

Vibhakti – विभक्ती

त्याने मला मारले.

या वाक्यातील मला या शब्दातील विभक्ती ओळखा….

उदा:

त्याने केसाने गळा कापला.

मुलाने कुत्र्यास मारले.

वरीलपैकी पहिल्या वाक्यात केसाने या शब्दामध्ये तृतीया विभक्ती असून कारकार्थ करण आहे. दुस-या वाक्यात मुलाने या शब्दात ने हा प्रत्यय आहे. त्यावरून ही तृतीया विभक्ती आहे, असे मानता येईल, मात्र मुलाने या शब्दातील विभक्तीचा कारकार्थ कर्ता असल्याचे दिसते. मग आता मुलाने या शब्दातील विभक्ती कोणती मानायची…. प्रथमा की तृतीया….. Vibhakti – विभक्ती

मी नदीच्या काठाने गेलो.

या वाक्यातील काठाने या शब्दातील विभक्ती ओळखा..

उदा:

तू रामाला पुस्तक दे

तो मुंबईला गेला.

वरीलपैकी पहिल्या वाक्यात रामाला या शब्दामध्ये चतुर्थी विभक्ती असून कारकार्थ संप्रदान आहे. दुस-या वाक्यात मुंबईला या शब्दात ला प्रत्यय आहे. त्यावरून आपण द्वितीया किंवा चतुर्थी विभक्ती असा निष्कर्ष काढला तर ते अचूक ठरेल का…. कारण मुंबईला या शब्दातील विभक्तीचा कारकार्थ अधिकरण आहे. मग मुंबईला या शब्दामध्ये कोणता विभक्ती प्रत्यय आहे.

Vibhakti – विभक्ती

उदा:

तो घरातून बाहेर पडला.

तुझ्या हातून हे काम होणार नाही.

वरीलपैकी पहिल्या वाक्यात घरातून या शब्दामध्ये पंचमी विभक्ती असून कारकार्थ अपादान आहे. दुस-या वाक्यात हातून या शब्दात ऊन प्रत्यय आहे. त्यावरून आपण येथे पंचमी विभक्ती आहे, असे निर्विवादपणे म्हणू शकतो काय…. प्रत्ययावरून पंचमी म्हणावं तर, कारकार्थ करण असा आहे… मग हातून या शब्दामध्ये कोणता विभक्ती प्रत्यय आहे….(Vibhakti)

उदा:

तो दिवसाचा झीपतो.

मी रात्री घरी परतेन.

वरीलपैकी पहिल्या वाक्यात दिवसाचा या शब्दामध्ये चा या प्रत्ययावरुन आपण त्यात षष्ठी विभक्ती आहे, असे म्हणू शकतो. मात्र त्यातील कारकार्य अधिकरण असा आहे. दुस-या वाक्यात रात्री या शब्दामध्ये ई प्रत्यय आहे व त्यावरून या शब्दात सप्तमी विभक्ती आहे व विभक्तीचा कारकार्थ अधिकरण आहे, हे निर्विवाद म्हणता येईल. मग पहिल्या वाक्यातील दिवसाचा या शब्दातील विभक्ती कोणती….(Vibhakti)

यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की..

वाक्यात शब्दाशब्दांमधील संबंध प्रत्ययांनी दाखवले जातात. विभक्ती ही या संबंधावरून म्हणजे अर्थावरून मानावी की हा अर्थ व्यक्त करणारे जे प्रत्यय असतील, त्यावरुन मानावी, हा वाद नेहमी निर्माण होतो. अर्थाशिवाय प्रत्यय नाहीत आणि प्रत्ययाशिवाय अर्थ व्यक्त करता येत नाही. अर्थ व प्रत्यय हे परस्परांवर अवलंबून असल्यामुळे विभक्ती या प्रत्ययावरुन मानाव्या असे म्हणता येईल

Vibhakti – विभक्ती

विभक्ती-विभक्तीमधील फरक प्रत्ययामुळे सहज ओळखता येतो. म्हणून विभक्ती ही कारकार्थावरून मानण्यापेक्षा प्रत्ययांवरुन मानावी.

विभक्तीमुळे विविध अर्थ आपण व्यक्त करू शकतो. प्रथमेचा अर्थ कर्ता, द्वितीयेचा अर्थ कर्म, असे सामान्यतः गृहित धरले जात असले तरी, एका विभक्तीने दुस-या विभक्तीचे अर्थही आपण व्यक्त करतो. म्हणून विभक्ती ओळखताना त्या शब्दाला कोणता प्रत्यय लागला आहे हे पाहून प्रत्ययावरून विभक्ती सांगावी. मग विभक्तीचा अर्थ वेगळा असला तरी चालेल. 

Vibhakti – विभक्ती

पुढील वाक्यांतील अधोरेखित शब्दांच्या विभक्ती व कारकार्थ सांगा.

1) बुधवारी भरणा-या जुन्या बाजारात रेंगाळणं हा बाबांचा आवडता छंद होता.

2) पेशव्यांच्या चढाईने निजामाला पळता भुई थोडी झाली.

3) म्हणून भगवन् शेवटच्या समराला सामोरी जाताना माझ्या शरीराला व मनाला तेवढे बळ दे.

4) आमच्या विमानाने बँकॉकचा तो सुंदर विमानतळ गाठला.

5) रुपयाला चार आंबे.

6) ती माझी लग्नाची बायको आहे.

7) टाळ्यांच्या गजरात ठराव मान्य झाला.

8) वासरांत लंगडी गाय शहाणी.

9) आम्ही विष्णूदास मऊ मेणाहूण.

10) तो भिंतीशी बसला.

11) तो कानाने बहिरा आहे.

12) मी एका घावात दोन तुकडे केले.

13) मी तुझ्यापायी बुडालो.

14) त्याच्या वागण्याचा मला राग आला.

15) मंदिरात दगडाची मूर्ती आहे.


Sugam Marathi Vyakaran (M R Walambe)


क्रियापद – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नाम – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रयोग – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

समास – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

अलंकार – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

इतिहास – वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment